नंदुरबारात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ
उद्यापासून तीन दिवस शहर कडकडीत बंद : नागरीकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन
नंदुरबार : 48 वर्षीय रुग्णाचा कोरोना पॉझिटीव्ह अहवाल शुक्रवारी आल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या बाबीला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दुजोरा दिला आहे. शनिवार, 18 एप्रिलपासून नंदुरबार शहर तीन दिवसांसाठी कडकडीत बंद ठेवण्यात येणार असून नागरीकांनी घाबरून न जाता घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नागरीकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन
शहरातील एका भागातील 48 वर्षीय इसमास जिल्हा सामान्य रुग्णालयात त्रास होत असल्याने गुरुवारी दाखल करण्यात आल्यानंतर त्याची तपासणी करण्यात आली होती. शुक्रवारी प्रशासनाला या रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याने हा रुग्ण राहत असलेला एक किलोमीटरचा परीसर कंटेंटमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. या परीसरात कुठल्याही वाहनांना जाण्या-येण्यास आता परवानगी नसणार असल्याचे सांगण्यात आले तर काटेकोरपणे नागरीकांनी संचारबंदीचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता घरातच रहावे तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.





