आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह 34 जण भुसावळात दोन तास ‘डिटेन’

कार्यकर्त्यांची शासनाविरूध्द घोषणाबाजी : पोलिस अधीक्षक डॉ.रेड्डी तळ ठोकून


34 people including MLA Chandrakant Patil detained for two hours in Bhusawal भुसावळ (23 जुलै 2025) : इंदौर-हैद्राबाद महामार्गाच्या कामासाठी सुरू असलेल्या भूसंपादनाबाबत पुकारलेल्या आंदोलनात मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेत भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात 11 तर तालुका पोलिस ठाण्यात 23 अश्या 34 जणांना 2 तास स्थानबंध्द केले. यावेळी मुक्ताईनगरसह भुसावळ येथील शिंदे सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या बाहेर गर्दी केली होती, त्यांनी सरकारच्या विरूध्द घेाषणाबाजी केली.

काय घडले मुक्ताईनगरात
मुक्ताईनगर येथे रस्त्याच्या कामाविरूध्द शेतकर्‍यांनी आंदोलन केले होते. यावेळी आंदोलन चिघळत असल्याने पोलिस प्रशासनाने आमदार चंद्रकांत पाटील यांना ताब्यात घेतले. आमदार पाटील यांना ताब्यात घेतल्याने आंदोलक प्रचंड संतापले, यावेळी आमदार पाटील यांना मुक्ताईनगर येथून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात आणत त्यांना पोलिसांनी बसवून ठेवले, यामुळे पोलिस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी पोलिस ठाण्याच्या आवारात मुक्ताईनगरसह विविध ठीकाणचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमा झाले होते.

पोलिसांनी लावले बॅरीगेटस्
पोलिस ठाण्याच्या समोर वाढत असलेली गर्दी पहाता यावेळी पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी बॅरेकेट लावून आत येण्यास मज्जाव केला होता. यावेळी पोलिस अधिकारी, क्युआरटी (क्युक रिस्पॉन टीम) पोलिस पथक तैनात केले होते. पोलिस ठाण्याच्या परिसरात सुमारे 500 लोकांचा जमाव होता, यावेळी मुक्ताईनगर येथून वाहने भरून पदाधिकारी येत होते. तालुका पोलिस ठाण्यात सुध्दा काही पदाधिकार्‍यांना पोलिसांनी बसवून ठेवले होते. त्यांनाही कलम 68 नुसार अटक करून नंतर कलम 69 नुसार सोडून देण्यात आले. तालुका पोलिस ठाण्याच्या परिसरात पदाधिकार्‍यांनी गर्दी केली होती.

यावेळी बाजारपेठ पोलिस ठाण्यात 11 तर तालुका पोलिस ठाण्यात 23 अश्या 34 आंदोलकांना पोलिसांनी स्थानबंध्द केले होते. या सर्वांना सोडण्यात आले.

पोलिस अधीक्षक तळ ठोकून
या प्रकारामुळे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक अशोक नखाते हे वरिष्ठ अधिकारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तळ ठोकून होते. यावेळी आमदार पाटील, डॉ. रेड्डी यांची कॅबीनमध्ये चर्चा झाली. यावेळी पत्रकारांना पोलिस ठाण्याच्या आवारात जाण्यास मज्जाव केला होता. 3.26 वाजता आमदार पाटील यांना पोलिसांनी सोडले, यापूर्वीच अधीक्षक डॉ. रेड्डी रवाना झाले.

भविष्यात तीव्र आंदोलन
शेतकर्‍यांच्या भूमी अधिग्रहणबाबत शासनाकडून कमी मोबदला दिला जात आहे, जिल्हाधिकारी यांनी पोलिस, महामार्ग पोलिसांच्या पुढाकाराने आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांनी आजच्या दिवसात हे आंदोलन मोडून काढले, घटनेने दिलेल्या अधिकारातून आंदोलन केले, भविष्यात योग्य मोबदल्यासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !