चोपडा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई : चार गावठी कट्ट्यांसह पुणे, धाराशिवचे आरोपी जाळ्यात
Chopra Rural Police’s major action : Pune, Dharashiv accused along with four village gangs caught in the net चोपडा (25 जुलै 2025) : चोपडा ग्रामीण पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पुण्यासह धाराशीवमधील दोन आरोपींना चार गावठी कट्टे व आठ जिवंत काडतूसासह अटक केली आहे.
पार उमर्टी पुन्हा ऐरणीवर
मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील पारउमर्टी हे गाव गावठी शस्त्र निर्मितीसाठी कुप्रसिद्ध आहे. येथून महाराष्ट्रात शस्त्र तस्करी रोखण्यासाठी जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली चोपडा तालुक्यातील उमर्टी आणि सत्रासेन परिसरात गेल्या एक महिन्यापासून 24 तास नाकाबंदी लावण्यात आली आहे.





संशय येताच कारवाई
शनिवार, 23 रोजी सत्रासेन नाका येथे पोलीस कर्मचारी रावसाहेब पाटील आणि घनश्याम पाटील हे नाकाबंदीवर तैनात असताना, त्यांना उमर्टीकडून एक दुचाकी वेगाने येताना दिसली. पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून तिला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, चालकाने गाडी वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब पाटील यांनी जीवाची पर्वा न करता धाव घेत आरोपींना शिताफीने पकडले, ज्यात ते दुचाकीसह खाली कोसळले.
ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी दुचाकीस्वारांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे मोठा शस्त्रसाठा आढळून आला. मंथन मोहन गायकवाड (22, रा. हडपसर, पुणे) याच्या बॅगेत तीन गावठी कट्टे आणि सहा जिवंत काडतुसे सापडली. स्वप्नील विभीषण कोकाटे (32, रा.वाशी, जि. धाराशिव) याच्याकडे एक कट्टा व दोन जिवंत काडतुसे मिळून आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल भवारी आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
तपासात मोठे रॅकेट उघड
पोलिसांनी दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता, यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. आरोपींनी सांगितले की, त्यांचे साथीदार आप्पासाहेब गायकवाड आणि कानिफनाथ बहीरट हे धुळ्यात एका चारचाकी गाडीसह थांबले होते. या दोघांनीच आरोपींना शस्त्र आणण्यासाठी दुचाकी दिली होती. शस्त्रे मिळाल्यानंतर त्यांना चारचाकी गाडीतून सुरक्षितपणे पुढे नेण्याची योजना होती.
पसार आरोपींचा कसून शोध
आरोपींनी हा शस्त्रसाठा उमर्टी येथील ‘पाजी’ नावाच्या एका व्यक्तीकडून 50 हजार रुपयांना खरेदी केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या मंथन गायकवाडवर यापूर्वीही शस्त्र विक्रीचे गुन्हे दाखल आहेत. पोलीस आता फरार आरोपींचा शोध घेत असून, हा शस्त्रसाठा नेमका कोणाला विकला जाणार होता, याचा तपास करत आहेत. या कारवाईमुळे जळगाव पोलिसांनी केवळ शस्त्रसाठाच जप्त केला नाही, तर पुणे आणि धाराशिवसारख्या शहरांमध्ये पोहोचण्यापूर्वीच संभाव्य गुन्हेगारी घटनांना मोठा आळा घातला आहे.
