25 हजारांची लाच भोवली : चाळीसगाव तहसीलच्या तलाठ्यासह तिघे जाळ्यात
धुळे एसीबीचा चाळीसगावात सापळा यशस्वी ः लाचखोर हादरले
Bribe of Rs 25,000 taken: Three people including Talathi from Chalisgaon taluka caught in the net चाळीसगाव (31 जुलै 2025) : वडिलोपार्जित शेत जमिनीच्या सातबारा उतार्यावरील ईतर हक्कातील जुनी कालबाह्य नोंद कमी करण्यासाठी 25 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना चाळीसगावातील महिला तलाठी मोमीन दिलशाद अब्दुल रहिम (29, रा.प्लॉट नंबर 9, हरी ओम नगर, राणी पार्क हॉटेल मागे, रावसाहेब वाघ यांच्या घरात, चाळीसगाव), रोजगार सेवक वडिलाल रोहिदास पवार (40, मु.पो. लोंजे, ता.चाळीसगाव) व दादा बाबू जाधव (40 , रा.मु.पो.लोंजे, ता.चाळीसगाव) यांना धुळे एसीबीने बुधवार, 30 रोजी सायंकाळी तहसील कार्यालयाबाहेर अटक केली. या कारवाईनेे महसूलमधील लाचखोर पुरते हादरले आहेत.
असे आहे लाच प्रकरण
35 वर्षीय तक्रारदाराचे वडील व इतर सात यांच्या मौजे पाथरजे, ता.चाळीसगाव येथे वडिलोपार्जित शेत-जमिनीच्या 7/12 उतार्यावरील ईतर हक्कातील जुनी कालबाह्य नोंद कमी होण्यासाठी त्यांच्या वडिलांनी केलेला अर्ज घेऊन तलाठी मोमीन यांची त्यांच्या कार्यालयात जावून भेट घेतली असता त्यांनी रोजगार सेवक पवार यांना भेटण्यास सांगितले व त्यांनी देखील तुमचे काम करून देते, लाचेची अपेक्षा व्यक्त केली व 3 रोजी तक्रार दाखल करण्यात आली.





त्यानंतर 14 रोजी तक्रारदाराने रोजगार सेवकाची भेट घेतल्यानंतर त्यांनी तलाठी यांना कामाबाबत उद्या सांगते, असे सांगितले व 17 रोजी तक्रारदाराने रेाजगार सेवकाची भेट घेतल्यानंतर आरोपी तलाठी यांनी काम करून देण्याच्या मोबदल्यात 25 हजार रुपये घेण्याबाबत सांगितले. यावेळी आरोपी दादा जाधव यांनी लाच देण्यासाठी अपप्रेरणा देऊन प्रोत्साहित केले.
तीन लाचखोरांना अटक
गुरुवार, 30 रोजी सापळा रचल्यानंतर आरोपी रोजगार सेवक पवार यांना तलाठी कार्यालयाबाहेर लाच स्वीकारताच अटक करण्यात आली व नंतर तलाठी व खाजगी पंटराला बेड्या ठोकण्यात आल्या व त्यांच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तीन्ही आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, चालक जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.
