भुसावळ शहरातील दोन्ही कुविख्यात गुन्हेगार हद्दपार : प्रांतांच्या आदेशाने खळबळ
Both notorious criminals from Bhusawal city deported: Provincial order creates stir भुसावळ (31 जुलै 2025) : शहरातील गुन्हेगारी पार्श्वभुमीच्या दोघांना जळगाव जिल्ह्यातून प्रांतांधिकारी जितेंद्र पाटील यांनी हद्दपार केले आहे. याबाबतचे आदेश बुधवारी काढण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
यांच्यावर झाली कारवाई
गिरीष गोकुळ जोहरी (20, रा. दिनदयाल नगर, भुसावळ) व शम्मी प्रल्हाद चावरीया (40, रा.वाल्मीक नगर, जामनेर रोड, भुसावळ) अशी हद्दपार संशयीतांची नावे आहेत.
गिरीश जोहरीला महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 56(1)(अ)(ब) अंतर्गत कारवाई करून एक वर्षासाठी जिल्हा हद्दपार करण्यात आले आहे. यामुळे त्याने या आदेशापासून तात्काळ जळगाव जिल्हा रस्ते किंवा रेल्वेमार्गाने सोडावा लागेल, तसेच हद्दपारीच्या कालावधीत तो उपविभागीय दंडाधिकारी किंवा शासनाच्या लेखी परवानगीशिवाय जिल्ह्यात प्रवेश करू शकणार नाही.
तसेच शम्मी प्रल्हाद चावरीया (वय 40, रा. वाल्मीक नगर, जामनेर रोड, भुसावळ) याच्यावरही संबंधित कलमाखाली कारवाई करत सहा महिन्यांसाठी जिल्हा हद्दपार करण्यात आले आहे. चावरिया यालाही तत्काळ जिल्हा सोडावा लागणार असून याचाही जिल्ह्यात प्रवेश प्रतिबंधित राहील.
संबंधित व्यक्तीविरूध्द बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. अशी माहिती देण्यात आली.
हद्दपारीच्या अटी
या कालावधीत संबंधित व्यक्तींनी जर महाराष्ट्र राज्याबाहेर वास्तव्यास गेल्यास, त्यांनी महिन्यातून एकदा नजीकच्या पोलीस स्टेशनला स्वतःचा सविस्तर पत्ता नोंदवणे बंधनकारक आहे. राज्याबाहेर गेल्यास 10 दिवसांत आणि परत आल्यानंतर 10 दिवसांत पोलिसांना माहिती देणे आवश्यक आहे.
अपीलची संधी
जर या आदेशांविरोधात संबंधित व्यक्तींना आक्षेप असेल, तर आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्त, नाशिक यांच्याकडे अपील करता येईल. या आदेशाची प्रत जिल्हा दंडाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन व संबंधित व्यक्तींना स्वतंत्रपणे कळविण्यात आली आहे.


