वाढत्या स्पर्धेच्या युगात सत्यता तपासूनच समोर यावी बातमी !
भुसावळात ‘नवरत्नां’च्या सन्मान सोहळ्यात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे : वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

In this era of increasing competition, news should be presented after verifying the truth! भुसावळ (3 ऑगस्ट 2025) : अलीकडे माध्यमांमध्ये प्रचंड स्पर्धा वाढली आहे. पूर्वी अल्प वृत्तपत्र होते त्यामुळे अनेकदा वाचनालयात वृत्तपत्र वाचण्यासाठी जावे लागत होते मात्र आता डिजिटल मिडीयाचा वेगार प्रसार झाल्याने परिस्थिती बदलली आहे. आजची घटना अगदी तत्काल आपल्याला मोबाईलमधून पाहता व वाचता येते मात्र जलद न्यूज देत असताना बातमीची सत्यता तपासूनच बातमी समोर यावी, अशी अपेक्षा वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केली. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या सहाव्या वर्धापनदिन सोहळ्यात ते अतिथी म्हणून बोलत होते.
सन्मान सोहळ्याचा उपक्रम स्तुत्य
शहरातील स्टार लॉनमध्ये ‘सर्वात वेगवान, सर्वात विश्वसनीय’ ब्रीद घेवून कार्यरत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ या खान्देशातील वेब न्यूज पोर्टलचा सहावा वर्धापनदिन सोहळा शनिवार, 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार अमोल जावळे, ताप्ती एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष मोहन फालक, लाईव्ह ट्रेण्ड न्यूजचे संपादक शेखर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व शेकडो वाचकांच्या साक्षीने पार पडला.
‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ न्यूज पोर्टलने उमटवला वेगळा ठसा
याप्रसंगी मंत्री संजय सावकारे म्हणाले की, पूर्वी टीव्हीसमोर बसून लोक बातम्या ऐकत असत मात्र आता हल्ली मात्र दिवसभर त्याच त्या बातम्या टीव्हीवर ऐकवल्या जातात. डिजिटल मिडीया आल्याने आता उद्या वाचण्यास मिळणारी बातमी क्षणात वाचता येते मात्र डिजिटल माध्यमांनी सत्यता तपासून बातमी द्यायला हवी. न्यूज पेपर वाचायची गरज कमी झाली असलीतरी प्रिंट मिडीयाचे महत्व अबाधीत आहे. भुसावळसारख्या शहरातून ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ न्यूज पोर्टलने वेगळा ठसा उमटवला आहे शिवाय नवरत्नांचा सन्मान सोहळा व ‘भुसावळ भूषण पुरस्कार’ देवून सामाजिक दायीत्व निभावले आहे.
आता केवळ सत्य जगापुढे येणारी पत्रकारीता असेल
पत्रकार शेखर पाटील म्हणाले की, पत्रकारीता क्षेत्रापुढे आता अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. आगामी काळात केवळ जगापुढे सत्य येणारी पत्रकारीता असणार आहे. भुसावळसारख्या शहरातून ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने उमटवलेला ठसा व केलेली प्रगती कौतुकास्पद आहे.
पुरस्काराने मिळाले बळ
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे म्हणाल्या की, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने विविध क्षेत्रात कार्यरत लोकांना शोधून त्यांचा केलेला सन्मान निश्चितपणे कौतुकास्पद आहे. अनेक ठिकरणी पुरस्काराचे स्वरूप मोठे ठेवून त्याबद्दल पुरस्कार्थींकडून रक्कम घेतली जाते मात्र ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने स्वखर्चातून उपक्रम राबवल्याचे कौतुक आहे. भारतीय संस्कृतीला अनुसरून औक्षण करून प्रत्येक पुरस्कार्थीला सन्मानीत करण्यात आल्याची बाब कौतुकास्पद आहे. पुरस्काराने जवाबदारी वाढली असून अधिक जोमाने चांगले काम करण्याचा प्रयत्न असेल, असेही रजनी सावकारे म्हणाले.
पुरस्काराने वाढली जवाबदारी
डॉ.सांतनू कुमार साहू म्हणाले की, आज मिळालेला पुरस्कार खरे तर दोन वर्षांच्या परिश्रमाचे यश आहे, पुरस्काराने आता अधिक जवाबदारी वाढली आहे. रुग्ण सेवेसाठी आम्ही नेहमीच सज्ज असल्याचे डॉ.साहू यांनी सांगितले.
असे होते पुरस्काराचे स्वरूप
कार्यक्रमासाठी उपस्थित पुरस्कारार्थींनी सन्मानचिन्ह, बुके, गिप्ट तसेच ‘बहिणाईंची कहाणी व गाणी’ हे पुस्तक सप्रेम भेट देण्यात आले. वाचनाची गोडी लागण्यासाठी व वाचन संस्कृती जपली जावी हा या मागील उद्देश होता.
या ‘नवरत्नांचा’ सन्मान
याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत नवरत्नांचा मान्यवरांनी सन्मान केला. विविध क्षेत्रातील सेवाव्रतींचा प्रसंगी गौरव होईल. महिला सबलीकरण- रजनी सावकारे, नाट्य (सांस्कृतिक), शैक्षणिक- प्राचार्य अनघा पाटील, महिला समुपदेशन- भारती रंधे-म्हस्के, प्रेरणा देशमुख, आरोग्य- प्रवीण फालक, सामाजिक- सोनू मांडे, वैद्यकीय- डॉ.सांतनूकुमार साहू, भाषा अभ्यासक- प्र.ह.दलाल, सांस्कृतिक- गणेश फेगडे यांना गौरवण्यात आले.
‘चौघांना भुसावळ भूषण पुरस्कार’
राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्याहस्ते गौरवण्यात आलेल्या व एम.आय.तेली इंग्लिश मेडियम स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या नूर फातेमा मण्यारसह बँकॉकमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्केटींगमध्ये गोल्ड मेडल पटकावणार्या तीर्थराज मंगेश पाटील (भुसावळ), बालभारती अभ्यास मंडळावर निवड झालेल्या तसेच राज्य शासनाचा शिक्षक पुरस्कार पटकावणार्या डॉ.जगदीश पाटील, आरोग्य दूत म्हणून काम करणायर्या भुसावळातील मयूर अंजाळेकर यांचा ‘भुसावळ भूषण पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला. प्रास्ताविक ब्रेकिंगचे कार्यकारी संपादक गणेश वाघ यांनी तर सूत्रसंचालन प्रा.जतीन मेढे यांनी केले. यशस्वीतेसाठी अमोल देवरे, दीपक सोनार, गणेश सोनार, मयूर जाधव व ब्रेकिंगच्या सर्व टीमने परिश्रम घेतले.
‘वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन’
मान्यवरांच्या पुरस्कार सोहळ्यानंतर कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांच्याह स्ते ‘विकासाच्या वाटा’ या विशेषांकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. 70 जीएसएम मॅफली कागदावर प्रिंट केलेली सुबक पुरवणी पाहून मंत्री संजय सावकारे यांनी विशेष कौतुक केले.
ब्रेकिंगवर शुभेच्छांचा वर्षाव
सहाव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष राहून, फोनवरून तसेच सोशल मिडीयातून शुभेच्छांचा वर्षाव करीत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ पोर्टलवरील आपले प्रेम अधिक वृद्धिंगत केले.