प्राथमिक माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी बेमुदत सामूहिक रजेवर


Officials of the Primary and Secondary Education Department on indefinite collective leave जळगाव (8 ऑगस्ट 2025) : नागपूर विभागातील बोगस शालार्थ आयडी प्रकरण चर्चित आहे. प्राथमिक चौकशी अहवालावरून सदर बोगस शालार्थ प्रकरण सायबर स्कॅम असल्याचे दिसून येत असताना देखील अधिकार्‍यांना अटक केली जात आहे. याविषयी शिक्षण विभागातील राजपत्रित अधिकारी गट-अ व ब तसेच सर्व कर्मचारी शुक्रवारपासून बेमुदत सामूहिक रजेवर असल्याचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील शिक्षण विभागातील कार्यालयात शुकशुकाट होता.

राज्यात बोगस शालार्थ प्रकरण चर्चेत
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघ, महाराष्ट्र राज्य यांनी काढलेल्या पत्रानुसार नागपूर विभागामध्ये बोगस शालार्थ प्रकरण सातत्याने चर्चित आहे. प्राथमिक चौकशी अहवालावरून सदर बोगस शालार्थ प्रकरण हे सायबर स्कॅम असल्याचे दिसून येत आहे.





बेमुदत आंदोलनाचा पवित्रा
बोगस शिक्षकांना बोगस शालार्थ आयडी देऊन शालार्थ प्रणालीतून वेतन अदा होत असल्याने ही बाब गंभीर आहे. हे कृत्य शालार्थ प्रणालीत तांत्रिक छेडछाड किंवा लॉगीन आयडी पासवर्ड वापरून चुकीच्या पद्धतीने झाले असल्याचे संघटनेचे मत आहे. यातील गुन्हेगारांना शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणांमध्ये नागपूर येथील वरिष्ठ अधिकार्‍यांना अटक झाली असून संघटनेच्या मतानुसार मुख्याध्यापकाच्या माध्यमातून चार ते पाच वेळेस कागदपत्रांची हाताळणी व प्रमाणीकरण होत असते मात्र वेतन बिलावर प्रति स्वाक्षरी केली म्हणून त्यांना अटक केली गेली आहे. ही बाब चुकीची आहे. यासाठी 1 ऑगस्टला एक दिवसाचे सामूहिक रजा घेऊन आंदोलन करण्यात आले होते. यावेळी मागण्यांचे निवेदन दिले होते. परंतु यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने शुक्रवार पासून शिक्षण विभागातील गट-अ व ब सर्व कर्मचारी यांनी बेमुदत आंदोलनाचा पवित्रा अवलंबला आहे.

अधिकार्‍यांना अटक न करण्याची मागणी
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री, राज्य शालेय शिक्षण मंत्री, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सचिव तसेच आयुक्त यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये विभागाच्या परवानगीशिवाय कोणत्याही अधिकार्‍याला अटक करू नये. विधिमंडळात नेमलेल्या एसआयटी मार्फत चौकशी करावी व दोषींवर कार्यवाही करावी. सहकार्य करणार्‍या अधिकार्‍यांना विनाकारण अटक करू नये. त्यांना म्हणणे मांडण्याची संधी द्यावी. यासह विविध मागण्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघ महाराष्ट्र यांच्या वतीने करण्यात आले आहे या आशयाचे निवेदन आज उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांना देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या नेतृत्वात उपशिक्षणाधिकारी स्वाती हवेले अधीक्षक सचिन मगर, रियाज तडवी, शिक्षण विस्तार अधिकारी संघटना नाशिक विभागाचे विभागीय अध्यक्ष विजय पवार, बी.डी.धाडी, प्रतिभा सानप, फिरोज पठाण, एजाज शेख, खलील शेख, अनिता परमार, विजय सरोदे, तुषार प्रधान आदी उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !