सुवर्णकार समाजाच्या हॉल बांधकामासाठी 25 लाखांचा निधी देणार : भुसावळात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे
नरहरी महाराजांच्या जयंतीनिमित्त सुवर्ण कारागीरांसह गुणवंतांचा सन्मान
भुसावळ (10 ऑगस्ट 2025) : जगात हाताने बारीक कला कुसरीचे काम करणारे सुवर्णकार हे केवळ भारतात आढळतात. भुसावळातील नवअहिर सुवर्णकार मंडळाने समाजातील अशा सुवर्ण कारागीरांसह गुणवंतांचा केलेला गौरव हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद उपक्रम असल्याचे गौरवोद्गार वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी येथे काढले. भुसावळ शहरातील नवअहिर सुवर्णकार समाजबांधवांसाठी सामाजिक हॉल बांधण्यासाठी 25 लाखांची निधी आपण देत असून जागा मात्र समाजाने लवकर शोधायची आहे, अशी घोषणाही यावेळी मंत्री सावकारे यांनी येथे केले. शहरातील पांडुंग टॉकीजमागील श्री बालाजी मंदिरात रविवार, 10 ऑगस्ट रोजी आयोजित नरहरी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित गुणगौरव सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
जागा निश्चित करा : निधीची कमी पडू देणार नाही
मंत्री संजय सावकारे म्हणाले की, भुसावळ पालिका हद्दीत सध्या जागाच नाही त्यामुळे नजीकच्या ग्रामीण शिवारांमध्ये जागा शोधून ती निश्चित करावी व त्यासाठी आपणही सहकार्य करू. समाजाच्या हॉलसाठी आपण पहिल्या टप्प्यात 25 लाखांचा निधी जाहीर करीत असून भविष्यात निधी लागल्यास कमी पडू देणार नाही, असेही ते म्हणाले. संतांचे कार्य कुठल्याही एका समाजापुरता मर्यादीत नसते कारण संत हे संपूर्ण समाजाचे असतात. सर्व समाजाने एकत्र येऊन संतांच्या विचाराची अंमलबजावणी करावी आणि आदर्श समाज घडवावा, असे आवाहनही सावकारे यांनी केले. याप्रसंगी त्यांच्या उपस्थितीत समाजातील दहावी-बारावी, पदवी, पदव्युत्तर परीक्षेत यश प्राप्त गुणवंतांसह सुवर्ण कारागीरांचा सहृदय सन्मान करण्यात आला.






संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्नशील रहा : केशव भामरे
अतिथी केशव भामरे म्हणाले की, सुवर्णकार समाजाच्या विकासासाठी संघटीत होण्याची गरज आहे. सुवर्णकार समाजाची संस्कृती जोपासण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहून मुलांनी संस्कृती शिकवावी, असे आवाहन त्यांनी केले.
सुवर्ण कारागीर हीच समाजाची दौलत : नाना विसपुते
वसंत विसपुते म्हणाले की, समाजाची आदर्श शिस्त आणि या शिस्तीत घडणारे विद्यार्थी आणि शिस्तीची अंमलबजावणी करणारे कुटुंब तसेच सुवर्ण कारागीर हे समाजाची खरी दौलत आहे व ती टिकली पाहिजे. यावेळी डॉ.शरयू विसपुते व राजश्री सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले.
मान्यवरांच्या हस्ते इयत्ता दहावी बारावी पदविका पदवी पदव्युत्तर परीक्षांमध्ये यश मिळवणार्या विद्यार्थ्यांचा सन्मान आणि सत्कार शिल्ड बुके प्रमाणपत्र देऊन करण्यात आला

यांची होती प्रमुख उपस्थिती
विचार मंचावर कासोदा सराफ असोसिएशन अध्यक्ष केशवशेठ भामरे, भुसावळ सराफा असोसिएशन अध्यक्ष वसंत (नाना) विसपुते, नवअहिर सुवर्णकार समाज मंडळाचे अध्यक्ष गणेश सोनार, डॉ.शरयू विसपुते (जळगाव), सुवर्णकार समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा राजश्री सोनवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
241 समाजबांधवांची नेत्र तपासणी
कार्यक्रम प्रसंगी जळगावच्या कांताई नेत्रालयाच्या माध्यमातून नेत्र शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी 241 बांधवांची नेत्र तपासणी केली. 18 रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी कांताई नेत्राई सूचवण्यात आले.
यांचे यशस्वीतेसाठी परिश्रम
प्रास्ताविक प्रकाश विसपुते तर सूत्रसंचालन नारायण घोडके, प्रवीण मोरे, प्रा.श्यामकुमार दुसाने व आभार मनोज सोनार यांनी मानले.
यशस्वीतेसाठी अध्यक्ष गणेश दुसाने, उपाध्यक्ष मोहन सोनवणे, राजेंद्र सोनार, सचिव नारायण घोडके, सहसचिव डॉ.श्याम दुसाने, कोषाध्यक्ष प्रकाश विसपुते, कार्यकारणी सदस्य संतोष सोनार, विश्वनाथ सोनार, प्रशांत सोनार, अनिलदत्त सोनार, मनोज सोनार, प्रवीण मोरे, कमलेश निकुंभ, संजय सोनार, सुनील सोनगिरे, राजेंद्र पारोळेकर, हिमांशू दुसाने आणि महिला कार्यकारणी सदस्यांसह नवअहिर सुवर्ण समाजबांधवांनी परिश्रम घेतले.
