भुसावळात स्टेशन मास्तर असोसिएशनचे डीआरएम कार्यालयसमोर धरणे
विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी : 50 हून अधिक स्टेशन मास्तरांचा सहभाग
भुसावळ (13 ऑगस्ट 2025) : ऑल इंडिया स्टेशन मास्तर असोसिएशनतर्फे विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवार, 11 रोजी डीआरएम कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करण्यात आले. सकाळी 10 ते दुपारी दोन असे चार तास निदर्शने करुन धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भुसावळसह विभागातील 50 पेक्षा जास्त स्टेशन मास्तरांनी सहभाग घेतला.
या मागण्यांचे डीआरएम यांना निवेदन
या आंदोलनादरम्यान स्टेशन मास्तरांनी सात रात्र ड्युटी रोस्टर चार दिवसांवर आणावा, आर.ओ. वॉटर व खराब फर्निचर तात्काळ बदलावे, सेकंड स्टेशन मास्तरांची पदसंख्या वाढवावी,पदोन्नतीची यादी तातडीने तयार करावी अशा विविध मागण्यांसाठी घोषणाबाजी केली. आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन डीआरएम पुनीत अग्रवाल यांना सादर केले.

यांचा आंदोलनात सहभाग
आंदोलन दरम्यान विभागीय अध्यक्ष विकी पवार, क्षेत्रीय अध्यक्ष विजय झूजेराव, सहाय्यक विभागीय सचिव सतीश रोकडे, अनिल नारखेडे यांच्यासह मोठ्या संख्येने स्टेशन मास्तर उपस्थित होते. यावेळी संघटनेच्या जेष्ठ पदाधिकार्यांनी स्टेशन मास्तरांना सुविधा व सेवा नसल्याने त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची खंत व्यक्त केली. स्टेशन मास्तर असोसिएशनतर्फे मांडलेल्या मागण्यांना रेल्वे प्रशासनाने तात्काळ मंजूर कराव्यात,अन्यथा पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला.




