500 कोटींचा बॉम्ब : मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिप जाहीर करत सत्ताधार्यांना दिला इशारा !
जरागेंनी ऐकवलेल्या ऑडीओ क्लीपने राज्याच्या राजकारणात खळबळ : श्रीकांत शिंदेचेही क्लीपमध्ये नाव
छत्रपती संभाजीनगर (गुरुवार, 22 ऑक्टोबर 2026) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि महायुतीतील काही नेत्यांवर गंभीर आरोप करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. आज पत्रकार परिषद घेत जरांगे यांनी ऑडिओ क्लिप ऐकवली. या ऑडिओ क्लिपमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यामार्फत मनोज जरांगेंना 500 कोटी रुपये पोहोचवल्याचा उल्लेख आहे तसेच भाजपकडून षडयंत्र रचलं जात असल्याचा दावा देखील मनोज जरांगेंनी केला आहे.
विरोधकांना आर्थिक मदत दिल्याचा आरोप
पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी आपल्या आंदोलनाविरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्तींना आर्थिक मदत देऊन आंदोलनाविरोधात बोलण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. यासाठी पक्षनिधी उपलब्ध नसल्यास वैयक्तिक निधी वापरणे, वाहनांचा खर्च उचलणे आणि मोर्चांसाठी मदत करणे, अशा बाबींचा कथित ऑडिओ संभाषणात उल्लेख आहे.

ऑडीओ क्लीपची व्हावी चौकशी
ऑडिओ क्लिप खरी असल्यास भाजपने स्पष्टीकरण द्यावं, अशी मागणी मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी केली आहे. ऑडिओ क्लिपची चौकशी करा, यामधील आवाजाची चौकशी करा…यानंतर दूध का दूध पानी का पानी होईल, असेही उदय सामंत म्हणाले.
500 कोटींच्या उल्लेखावरून नवा वाद
जरांगे यांनी जाहीर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये श्रीकांत शिंदे यांच्याकडून त्यांच्यापर्यंत 500 कोटी रुपये पोहोचल्याचा उल्लेख असल्याचा दावा त्यांनी केला. हा आरोप पूर्णपणे निराधार असल्याचे सांगत आपण कोणाकडूनही पैसे घेतले नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. या कथित संभाषणातून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या भूमिकेचा राजकीय फायदा-तोटा मोजला जात असल्याचे दिसत असल्याचा दावाही त्यांनी केला. या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी किंवा तपासाचा निष्कर्ष समोर आलेला नसल्याने या दाव्यांकडे आरोप म्हणूनच पाहणे आवश्यक आहे.
ऑडिओ क्लिपमध्ये संभाषण काय?
जरांगे पाटील को ऑलरेडी 500 करोड रुपये पहुँच चुके है…
श्रीकांत शिंदे के पाससे पहुँच चुके है…
जरांगे पाटील विधानसभा चुनाव मे हमारे फायदे का रहेगा या…नहीं रहेगा..इससे मेरा मत अलग है, कॅल्क्युलेशन अलग है..
आप जो सोचते है, जो तथ्य है वो तो है ही…
तर माझ्याकडे 2500 कोटी जमा होतील : जरांगेंचा दावा
जरांगे म्हणाले की, एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही दिल्लीतील भाजपच्या लोकांना माझ्याबद्दल काय सांगितलं? मनोज जरांगे पाटलांना 500 कोटी रुपये द्यायचेत आणि एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही भाजपकडून 500 कोटी रुपये घेऊन मला दिलेत असं तुम्ही भाजपच्या नेत्याला सांगितलं का?, कारण ते नेते कुजबुज करायला लागले आहेत. मनोज जरांगे पाटलांना श्रीकांत शिंदे यांच्या हाताने 500 कोटी रुपये पोहोचलेत.
जरांगे पाटील आपला थर्ड पर्सन आपला असं शिंदेसाहेब तुम्ही म्हणाले का???? तुम्ही मला पाचशे कोटी रुपये दिले का? तुम्ही मला जर दिले नसतील तर मग भाजप नेमकं तुम्हाला संपवतोय का? तुम्ही मला संपवतात ? याचा छडा मी लावल्याशिवाय गप्प बसणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. मी जर उद्या सकाळी बोललो ना मराठ्यांनी 100 रुपये टाका. तर उद्या माझ्याकडे 2500 कोटी जमा होतील. लहान विषय नाही शिंदेसाहेब…तुमचा माझा सामना तीन महिन्यानंतर होईल, असा इशाराही मनोज जरांगेंनी दिला मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सगळे आरोप फेटाळले. मी कुणालाही 500 कोटी दिले नाहीत, किंवा घेतले नाहीत. जरांगे पाटलांनी शहानिशा करुन बोलावं, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं. जरांगे पाटील यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावेत, त्याची चौकशी झाली पाहिजे, मग ‘दूध का दूध पानी का पानी’ होईल, असे म्हणत जरांगे पाटलांच्या आरोपवर त्यांनी प्रत्युत्तर दिलं.
सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांतील कथित रणनीतीचा उल्लेख
पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये केवळ मराठा आरक्षण आंदोलनापुरती चर्चा मर्यादित नसून विविध राजकीय आणि सामाजिक मुद्यांवर जनमत कसे घडवायचे, याबाबतही संभाषण असल्याचा दावा जरांगे यांनी केला. वृत्तपत्रांतील लेख, सोशल मीडियावरील हॅशटॅग, विविध घटनांवरून राजकीय वातावरण तयार करणे आणि विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी विशिष्ट मुद्दे पुढे आणणे, अशा बाबींचा कथित संभाषणात उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले मात्र या संभाषणाचा संपूर्ण संदर्भ, त्यातील व्यक्तींची ओळख आणि ध्वनिमुद्रणाची सत्यता यांची स्वतंत्र पडताळणी होणे महत्त्वाचे आहे.
शिंदे गटातील नेत्यांबाबतही गंभीर आरोप
आपल्या विरोधात बोलणार्या अनेक व्यक्तींना सत्ताधारी गटातील काही नेत्यांकडून मदत मिळत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. यासंदर्भात त्यांनी काही मंत्री आणि आमदारांची नावे घेतली. संबंधित नेत्यांना चुकीच्या व्यक्तींशी संबंध ठेवण्यापासून सावध केल्याचेही त्यांनी सांगितले.
बावनकुळे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुरावे असल्यास तक्रार करण्याचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर जरांगे यांनी सरकारवर टीका केली. सत्ता आणि तपास यंत्रणा सरकारच्या नियंत्रणात असताना या प्रकरणात सरकारने स्वतःहून चौकशी का सुरू करू नये, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आपली आणि मराठा समाजाची बदनामी करणार्या कथित मोहिमेची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी
कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाची सत्यता तपासून त्यामागील व्यक्ती आणि उद्देश समोर आणावेत, अशी मागणी जरांगे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केली. या प्रकरणात निष्पक्ष चौकशी व्हावी आणि सत्य जनतेसमोर यावे, असेही त्यांनी म्हटले.
एक-दोन महिन्यांत आणखी खुलासे करण्याचा इशारा
पत्रकार परिषदेच्या अखेरीस जरांगे यांनी आपल्या विरोधात कथितरीत्या सुरू असलेले प्रयत्न थांबवले नाहीत, तर येत्या एक-दोन महिन्यांत आणखी महत्त्वाचे खुलासे करणार असल्याचा इशारा दिला. आगामी निवडणुकांमध्ये जनता या सर्व घडामोडींचा हिशोब करेल, असेही ते म्हणाले.
