सणासुदीत रेल्वेचा दिलासा : परतीच्या प्रवासाच्या भाड्यात 20टक्के सवलत
राउंड ट्रिप पॅकेज अंतर्गत गुरूवारपासून आरक्षणाला सुरुवात
भुसावळ (13 ऑगस्ट 2025) : सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेने फेस्टिव्हल रश राउंड ट्रिप पॅकेज’ही योजना जाहीर केली आहे. या योजनेत परतीच्या प्रवासाच्या मूळ भाड्यावर 20 टक्के सवलत मिळणार आहे. गरूवार 14 ऑगस्पासून या योजनेअंतर्गत आरक्षणास सुरुवात होणार आहे.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही सवलत अशा प्रवाशांना मिळेल जे 13 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर दरम्यान जाण्याचा आणि 17 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर 2025 दरम्यान परतीचा प्रवास करतील. परतीच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण कालावधीची अट लागू होणार नाही. रेल्वे प्रशासनाकडून या योजनेच्या अटी व वैशिष्ट्ये सांगण्यात आले आहे, यात जाण्या-येण्याची दोन्ही तिकिटे एकाच प्रवाशाच्या नावाने व समान प्रवास जोडीसाठी असणे आवश्यक.
20 टक्के सवलत केवळ परतीच्या प्रवासाच्या मूळ भाड्यावर लागू होईल.फ्लेक्सी भाडे गाड्या वगळता सर्व वर्ग व विशेष गाड्यांसाठी योजना लागू राहणार आहे. तिकिटांचे भाडे परत केले जाणार नाही आणि कोणताही बदल करता येणार नाही. परतीच्या प्रवासासाठी इतर कोणत्याही सवलती लागू होणार नाहीत.
रेल्वेचा उद्देश
रेल्वे प्रशासनातर्फे स्पष्ट केले आहे की, या योजनेमुळे सणासुदीच्या कालावधीत गाड्यांची मागणी संतुलीत राहील, दोन्ही बाजूंचा प्रवास सुलभ होईल आणि प्रवाशांना किफायतशीर व नियोजित सेवा मिळेल.