भुसावळात रेल्वेतर्फे आयोजित देशभक्तीपर रांगोळी स्पर्धेला प्रतिसाद
भुसावळ (19 ऑग्स्ट 2025) : स्वातंत्र्य दिन 2025 उत्सवाच्या निमित्ताने भुसावळ रेल्वे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत आयोजित या स्पर्धेत विभागातील विविध शाखांतील रेल्वे कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सहभागी कर्मचार्यांनी आपल्या कलाकौशल्यातून देशभक्ती, स्वातंत्र्य, राष्ट्रीय एकात्मता व हर घर तिरंगा अभियानाचे संदेश प्रभावीपणे मांडले. विविधरंगी, आकर्षक व भावपूर्ण रांगोळ्यांनी कार्यालय परिसर देशभक्तीच्या वातावरणाने उजळून निघाला होता. या उपक्रमाद्वारे केवळ कलागुणांची अभिव्यक्तीच नव्हे तर देशाविषयी असलेले प्रेम व अभिमान यांचीही प्रचिती आली. कार्यक्रमाला विभागीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





