भुसावळातील कोंडी फुटणार ! : शंभर अतिक्रमीत हॉकर्सला गणपती मंदिराजवळ हक्काची जागा
भुसावळ (13 ऑगस्ट 2025) : शहरातील अप्सरा चौक ते डिस्को टॉवर तसेच फळविक्रेत्या 100 हॉकर्स बांधवांना आठवडे बाजारातील गणपती मंदिराजवळ जागा देण्याचे पालिकेचे नियोजन होते. मंगळवारी या नियोजनाला अखेर मुहूर्त गवसला. हॉकर्स झोनमधील 78 तसेच 22 फळविक्रेत्या अशा 100 जणांना सोडत पध्दतीने 6 बाय 8 फुटाच्या जागा वितरीत करण्यात आल्या. ओसवाल पंचायती वाड्यात मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या प्रमुख उपस्थितीत लहान बालकाच्या हातून चिठ्ठ्या काढून जागांचे वितरण करण्यात आले. यामुळे शहरातील बहूतप्रतिक्षीत हॉकर्स झोनचा प्रश्न निकाली निघाला आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे आता डिस्को टॉवर ते अप्सरा चौक तसेच याच परिसरात असलेल्या फळविक्रत्यांच्या जागा दिल्याने हा रस्ता मोकळा श्वास घेणार आहे.
हॉकर्स झोनमध्ये मिळतील सुविधा
पालिका प्रशासनाने पहिल्या टप्प्यात हॉकर्स बांधवांना गणपती मंदिराजवळ जागेचे वितरण केले आहे. या जागेवर हॉकर्सचे भोगवटादार म्हणून नावे लागणार आहेत. या ठिकाणी मोठा डोम बांधणे, पाणीपुरवठा व वीजपुरवठ्याची व्यवस्था केली जाणार आहे. अंतर्गत भागात सहा मिटरचा मुख्य व साडेतीन मिटरचा दुसरा उपमार्ग असेल.

पुन्हा थाटले होते अतिक्रमण
पालिकेने डिस्को टॉवर ते अप्सरा चौक या मार्गावरील अतिक्रमण काढून रस्त्याचे काँक्रीटीकरण केले. या रस्त्यावर दुभाजक टाकण्यात आले. मात्र गेल्या दीड महिन्यांपासून हॉकर्स बांधवांना जागा दिली जात नसल्याने हॉकर्स विक्रेत्यांनी त्याच ठिकाणी हातगाड्या लावल्या होत्या. यामुळे डिस्को टॉवर ते अप्सरा चौक या मार्गावर वाहतूकीची कोंडी झाली होती. आता ह प्रश्न निकाली निघेल.
पुन्हा अतिक्रमण होऊ नये
हॉकर्स बांधवांना जागा दिल्यानंतर आता डिस्को टॉवर ते अप्सरा चौक व फळविक्रेत्यांच्या प्यारेलाल भजेवाले लेनमध्ये पून्हा अतिक्रमण होऊ नये, म्हणून पालीका प्रशासनाला प्रयत्न करावे लागणार आहेत. यासोबतच गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी रस्त्यावरच अवैध पार्किंग झोन बनला आहे, यामुळे हा पार्किंग झोनही हटवून रस्ता वाहतूकीसाठी खुला करावा लागणार आहे.
यांची होती उपस्थिती
मुख्य बाजारपेठेतील अप्सरा चौक ते डिस्को टॉवर या दरम्यान हातगाडीवरुन व्यवसाय करणार्या हॉकर्स बांधवांनी 10 बाय 10 जागेची मागणी केली होती. चर्चेअंती त्यांना 6 बाय 8 फुट जागा दिली गेली. या लकी ड्रॉ प्रसंगी हॉकर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजू सपकाळे, उपमुख्याधिकारी परवेज अहमद, नगरपालिकेचे अभियंता पंकज मदगे, वैभव पवार आदींसह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
हॉकर्स बांधवांनी बुधवारपासून नवीन जागेत स्थलांतरीत व्हावे
मुख्य बाजारपेठ व मिरवणूक मार्गावर असलेल्या हॉकर्स बाधवांना गणपती मंदिराजवळ जागा दिली आहे. यामुळे आता बुधवारपासून त्यांनी या नवीन ठिकाणी दिलेल्या जागेवर आपल्या हातगाड्या व दुकाने लावावीत. यानंतर टप्प्याटप्प्याने त्यांना डोम, पाणी, पथदिवे आदींची सुविधा दिली जाणार असल्याचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले म्हणाले.




