कोल्हापूरला विकासाचं दालन उघडले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


Chief Minister Devendra Fadnavis कोल्हापूर (17 ऑगस्ट 2025) : कोल्हापूर सर्किट बेंचचं उद्घाटन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याहस्ते करण्यात आले. भूषण गवई यांचे कोर्ट परिसरामध्ये आगमन झाल्यानंतर त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. गार्ड ऑफ ऑनर देण्यात आल्यानंतर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याहस्ते मुख्य प्रशासकीय इमारत, ताराबाई इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायालय मूर्ती अलोक आराध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. यानंतर सरन्यायाधीश, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी कोर्टरुमची पाहणी केली. यानंतर सर्व मान्यवर मेरी वेदर ग्राउंडवर मुख्य सोहळ्यासाठी पोहोचले. यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच खंडपीठ लढ्याची चित्रफित दाखवण्यात आली. सरन्यायाधीशांचे कार्यक्रमस्थळी आगमन होताच त्यांचे चरणस्पर्श करून अनेक मान्यवरांनी त्यांचा आशीर्वाद घेतला.






कोल्हापूरला विकासाचं दालन उघडले : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले की, कोल्हापूरमध्ये आज इतिहास रचला जात आहे आणि त्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं. या सगळ्या प्रक्रियेत छोटा-छोटा वाटा उचलण्याचं भाग्य मला मिळालं. कोल्हापूरसह पुण्याचा विचार करावा असं पत्र नको तर कोल्हापूरमध्येच खंडपीठ व्हावं, अशी मागणी माझ्याकडे करण्यात आली. त्यानंतर आम्ही उच्च न्यायालयाला केवळ कोल्हापूरला खंडपीठ व्हावं असे पत्र दिले. आम्हाला जमीन आणि इमारतीबद्दल विचारणा झाली, त्याचीदेखील व्यवस्था केली, पण तरी देखील कोल्हापूरच्या सर्किट बेंचचे नाव निघत नव्हते. शेवटी भूषण गवई साहेब सरन्यायाधीश झाले आणि हा सर्किट बेंचचे काम सुरू झाले. सर्किट बेंचची मंजुरीच नाही तर उद्घाटनाची तारीखदेखील गवई साहेब यांनी सांगितली. सर्किट बेंचच्या मंजुरीची सर्व नियोजन गवई साहेबांनी पूर्ण केली. उच्च न्यायालयाचे पत्र आल्यानंतर देखील गवई साहेब यांनी लवकरात-लवकर उत्तर देण्याबाबत आम्हाला सूचना केल्या.

दिल्लीत बसून सुद्धा प्रत्येक दिवशी छोट्या छोट्या गोष्टीचा गवई साहेब आढावा घेत होते. आज आम्ही खंडपीठासाठी जमीन हस्तांतर केली आहे पण लवकरात-लवकर आराखडा तयार करून बांधकाम देखील आम्ही सुरू करू. कोल्हापूरला केवळ सर्किट बेंच आलं नाही तर विकासाचं दालन उघडलं आहे. कोल्हापूरच्या इतिहासाला साजेश काम इथून पुढे आम्ही करत राहू. अ‍ॅडव्होकेट प्रोटेक्शन अ‍ॅक्टचा आम्ही सकारात्मक विचार करत आहोत. 50 वर्षाच्या लढ्याचे शिवधनुष्य सरन्यायाधीश भूषण गवई यांनी समर्थपणे पेलले.

यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती चंद्रशेखर, सर्किट बेंचसाठी नियुक्त केलेले न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती शिवकुमार दिगे, न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती एस. जी. चपळगावकर, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती भारती डांगरे, कोल्हापूर जिल्हा पालक न्यायमूर्ती मनीष पितळे, न्यायमूर्ती अनिल किलोर तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, लोकप्रतिनिधी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !