रेल्वे अतिक्रमण धारकांचा प्रश्न मार्गी लावणार ! : भुसावळात वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे
रेल्वे अतिक्रमणधारकांचे बेमुदत ठिय्या आंदोलन तूर्तास स्थगित
Railways will resolve the issue of encroachment holders! : Textile Minister Sanjay Savkare in Bhusawal भुसावळ (17 ऑगस्ट 2025) : रेल्वे अतिक्रमण धारकांनी पालिका कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मंगळवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले होते. तब्बल सहा दिवसानंतर रविवार, 17 रोजी सायंकाळी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्याशी यशस्वी चर्चा केली. आंदोलनकर्त्यांच्या मागणीनुसार शहरातील सर्वे नंबर 63/1 या जागेवर पुनर्वसन करण्यासंदर्भात सोमवार, 18 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली असून पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तूर्त उपोषण आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले.
रेल्वे हद्दीतील पाच हजार घरे जमीनदोस्त
रेल्वे विभागाने गेल्या सात वर्षांपूर्वी विकासकामांच्या नावाखाली पाच हजार घरे जमीनदोस्त केली. सात वर्ष उलटूनही हा प्रश्न सुटत नसल्याने अतिक्रमणधारकांनी मंगळवार, 12 ऑगस्टपासून पालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. तापी काठावर सर्वे नंबर 63/1 या जागेचे आरक्षण उठवण्याचा प्रश्न मंत्रालयाच्या अखत्यारीत असल्याने ठोस आश्वासन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे नाहीच, असा पवित्रा वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीभा पाटील, युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांनी घेतला होता शिवाय लोकप्रतिनिधींच्या दारी बिर्हाड मोर्चा नेण्याचाही इशारा दिला होता.





अखेर मंत्र्यांनी दिले आश्वासन
रविवार, 17 ऑगस्ट रोजी मंत्री संजय सावकारे यांनी आंदोलनकर्ते व वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शमीबा पाटील व युवा जिल्हाध्यक्ष बाळा पवार यांच्यासह आंदोलकांशी चर्चा केली. उद्या सोमवारी जिल्हाधिकार्यांसोबत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली असून रेल्वे अतिक्रमितांचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही यावेळी मंत्री सावकारे यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन तूर्त मागे घेत असल्याचे जाहीर केले.
तर पुन्हा तीव्र आंदोलन : बाळा पवार
मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार तूर्त आम्ही आंदोलन मागे घेत आहोता मात्र रेल्वे अतिक्रमण धारकांना जोपर्यंत हक्काचे घरकूल मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही व लवकरात-लवकर प्रश्न मार्गी न लागल्यास परत एकदा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन पुकारले जाईल, असा इशारा बाळा पवार यांनी दिला. यावेळी विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भीम आर्मीने आंदोलन करीत वेधले लक्ष
रेल्वे अतिक्रमण धारकांचे हक्काच्या घरकुलासाठी गेल्या सहा दिवसांपासून आंदोलन सुरू असतानाही स्थानिक आमदारांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली होती. याकडे लक्ष वेधण्यासाठी बाजारपेठ पोलिस ठाण्याजवळ रविवारी सायंकाळी काँक्रिटीकरण रस्त्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या मंत्री संजय सावकारे यांच्या आगमनापूर्वी भीम आर्मीचे गणेश सपकाळे यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन सुरू करताच खळबळ उडाली. भाजपा पदाधिकारी व पोलिसांची सपकाळे यांना आंदोलनापासून रोखताना तारांबळ उडाली. वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी आंदोलकांची भेट घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर सपकाळे यांनी आंदोलन मागे घेतले.
