राज्यातील शेतकर्यांना लवकरच कर्जमाफी !
Loan waiver for farmers in the state soon! यवतमाळ (18 ऑगस्ट 2025) : राज्यात शेतकरी कर्जमाफीची मागणी जोर धरत असतानाच आता राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी केली जात आहे. दरम्यान, कर्जमाफीसंदर्भात मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते. तर, आमच्या जाहीरनाम्याप्रमाणे कर्जमाफी करू, असेही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले होते. आता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच कर्जमाफीची घोषणा करतील, अशी माहिती महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे.
मंत्री मंडळात सकारात्मक चर्चा
हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 46 व्या स्मृतिदिनी यवतमाळच्या पुसद येथे राज्यातील प्रयोगशील 13 शेतकर्यांना वसंतराव नाईक कृषि प्रतिष्ठानच्या वतीने कृषी गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना संकटग्रस्त शेतकर्यांना कर्जमाफी देण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच शेतकर्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करतील, अशी माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.





दुष्काळाचा शाप पुसणार
पुसदच्या माळ पठारावरील दुष्काळग्रस्त 40 गावांना पाण्याची उपलब्धता निर्माण करून तेथील दुष्काळ कायमस्वरूपी दूर करू, असे वचन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड व राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले. दरम्यान, राज्यातील शेतकर्यांचा सात बारा कोरा करा, अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे संस्थापक बच्चू कडू यांनीही आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले होते. त्यामुळे, शासन स्तरावर शेतकरी कर्जमाफीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात, मंत्री संजय राठोड यांनी तसे सूतोवाचही केले आहे.
