राज्यात अतिवृष्टीने घेतले 16 जणांचे बळी : मुंबईत लाईफलाईन विस्कळीत
मुंबई (19 ऑगस्ट 2025) : राज्यात पाऊस धो धो बरसत असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे तर विविध घटनांमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईत सुरू असलेल्या संततधारमुळे लाईफलाईन असलेली लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.
मराठवाड्यात 11 जणांचा मृत्यू
गेल्या दोन दिवसांपासून कोसळणार्या मुसळधार पावसाने राज्यभरात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात, मराठवाड्यात 11 जणांचा मृत्यू झाला आह.े नांदेड जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थितीमुळे 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे नांदेड जिल्ह्यात पोहोचले आहेत. तर, मुख्यमंत्र्यांनीही मुंबईसह महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा घेतला आहे.





कोकण, मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टी झाली असून पिकं पाण्याखाली गेली आहेत. तर, मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाली असून मुंबईतील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेचं दिसून आलं. राज्यातील अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने विसर्ग देखील सुरू झाला आहे.
लोकल सेवा विस्कळीत
मुंबईसह उपनगरात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून हवामान वेधशाळेचा अंदाज खरा ठरला आहे. त्यानुसार, आज शाळा आणि महाविद्यालयांना आधीच सुट्टी देण्यात आली होती. तर, लोकलसेवा खोळंबल्याने मुंबईतील चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल झाले. मुंबईत ठाण्याकडून सीएसएमटीकडे जाणारी लोकलसेवा काही तास बंद राहिली. मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या ट्रांस हार्बर मार्गिकेवर पाणी असल्याने अनेक गाड्या या रेल्वे रुळाकर थांबल्या, त्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी आणि गैरसोय झाली होती. मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाने हाहाकार उडाला आहे. दरम्यान, रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून मुंबई-पुणे-मुंबई जाणार्या अनेक ट्रेन रद्द झाल्या आहेत.
मराठवाड्यात पावसाने 11 जणांचा बळी
मराठवाड्यात 14 ऑगस्टपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले. मराठवाड्यात पावसामुळे आतापर्यंत 11 लोकांचा बळी गेला आहे. 498 छोट्या मोठ्या जनावरांचा मृत्यू झाला आहे. तर 350 पेक्षा अधिक घरांची आणि गोठ्यांची पडझड झाली आहे. सोबतच 1154 गावांना पावसाचा फटका बसला आहे.
नांदेडमध्ये पाच जणांचा मृत्यू
नांदेडमधील लेंडी नदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. धरणामध्ये वीस फूट पाणी वाढलं, जे काही नागरिक जागे होते त्यांनी गावकर्यांना जागं केलं. परंतु काही लोक गावात अडकली होती. त्या दुर्घटनेत गावातील चार महिला आणि एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. येथील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सगळं काही होतं ते तिथेच राहिलं, त्यामुळे शासनाची जबाबदारी वाढली आहे. नांदेडमध्ये कालच्या पावसाने 5 बळी गेले असून आज 2 मृतदेह शोधण्यात आले आहेत.
मृतांची नावे
पिराजी म्हैसाजी थोटवे-वय 70
चंद्रकला विठ्ठल शिंदे- 45
ललिताबाई भोसले -60
भीमाबाई हिरामण मादाळे -65
गंगाबाई गंगाराम मादाळे-65
मंत्री गिरीश महाजन मुखेडला रवाना
नांदेडमधील पूरस्थितीमुळे आणि लेडीं परिसरातील धरणग्रस्त नागरिकांची होत असलेले हाल लक्षात घेता, आआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन मुंबई विमानतळावरुन नांदेडला पोहोचले आहेत. तेथून मुखेड तालुक्यातील रावनगावात सर्च आपरेशनसाठी ते असणार आहेत. मराठवाड्यातील रावनगावात धरणाने पाणीसाठी ओलांडल्याने आणि नदीला पूर आल्याने मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.
मुंबईत 300 मिमि पाऊस : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील काही तास मुंबईत पावसाचा जोर कायम राहिल्यास आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याचे संकेत दिले. मिठी नदी धोकादायक पातळीवर गेल्याने आपल्याला 400-500 लोकांना आपल्याला हलवावं लागले. आज संध्याकाळी समुद्राला भरती येणार आहे. तेव्हा पावसाची परिस्थिती काय असेल ते बघावे लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.
