आधी पत्नीचा केला खून नंतर रिक्षा चालक पतीचीही आत्महत्या
First the wife was murdered, then the rickshaw driver husband also committed suicide नाशिक (19 ऑगस्ट 2025) : दारूच्या व्यसनापोटी दाम्पत्यात होत असलेल्या वादानंतर माहेरी गेलेली पत्नी पुन्हा आईच्या सांगण्यावरून सासरी परतली मात्र पतीच्या वागण्यात सुधारणा झाली नाही, उलट वाद वाढत गेला व त्यातून आधी पतीने पत्नीची साडीने गळा आवळून हत्या केली व नंतर स्वतःही आत्महत्या केली.
नाशिकमधील अंबड जवळच्या चुंचाळे गावाच्या परिसरात मंगळवार, 19 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. चेतन नाना माडकर (33), स्वाती चेतन माडकर (27) असे मयत झालेल्या दाम्पत्याची नावे आहेत.





काय घडले नाशिकमध्ये
चेतन माडकर हा त्याची पत्नी स्वाती माडकर व त्यांच्या तीन मुलांसह पंचवटीतील फुलेनगरात वास्तव्याला होता व रिक्षा चालवून व्यवसाय करीत होता. दारूच्या व्यसनापायी त्याचे पत्नीशी वाद होत होते. सतत होत असलेल्या वादाला कंटाळून स्वाती हिने त्याचे घर सोडून चुंचाळे या भागात आईच्या घरी मुलांसह राहण्यासाठी गेली होती. परंतु यानंतरही चेतन माडकर तिला व मुलांना भेटण्यासाठी तिच्या आईच्या घरी जात होता.
काही दिवसानंतर स्वातीच्या आईने चेतन आता चांगला वागत असल्याचे सांगितले. यानंतर स्वातीच्या सांगण्यावरून पती चेतन याने स्वातीची आई राहत असल्याच्या घराजवळच भाड्याची खोली घेऊन त्यांनी पुन्हा संसार सुरू केला मात्र चेतन याला सतत दारूचे व्यसन असल्याने तो घरी आल्यानंतर नेहमीच पत्नी स्वातीशी वाद घालत असे.
मयताविरोधात खुनाचा गुन्हा
सोमवारी रात्री देखील पतीने घरी आल्यानंतर दारूच्या नशेत पत्नी स्वातीबरोबर वाद घातला. यानंतर मध्यरात्री पत्नी तसेच घरातील त्यांची तीन मुले झोपलेले असताना चेतन याने पत्नीचा झोपेतच गळा आवळला. यामुळे स्वातीचा मृत्यू झाला. यानंतर त्याने स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. मयत स्वाती ह्या घराजवळच एका खासगी कंपनीत काम करून तीन मुलांचा सांभाळ करत होती. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात चेतनविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
