मुंबईत मोनो रेल थांबली : प्रवाशांना काचा फोडून बाहेर काढले
Monorail stopped in Mumbai : Passengers were evacuated by breaking the glass मुंबई (19 ऑगस्ट 2025) :मुंबईत एकीकडे पावसाने दाणाफाण उडवली असतानाच दुसरीकडे चेंबूर ते भक्ती मार्ग दरम्यान मोनो रेल मंगळवारी सायंकाळी 6.15 वाजेच्या सुमारास बंद पडून झुकताच प्रवाशांच्या गोटात प्रचंड खळब्ळ उडाली. दोन-तीन ठिकाणच्या काचा फोडून या प्रवाशांना मोनो रेलमधून बाहेर काढण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
तांत्रिक बिघाडामुळे ही घटना घडल्याचे मोनो रेल प्रशासनाकडून सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत, तीन स्नोर्केल वाहनांच्या मदतीने अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य सुरू केले होते.





चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान धावणारी मोनो रेल म्हैसूर कॉलनी स्थानकाजवळ अचानक बंद पडल्याने प्रवाशी घाबरले होते. प्रवाशांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 196 या क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर एक दुसरी मोनोरेल मदतीसाठी दाखल झाली. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. त्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदतकार्य सुरू केले.
विरोधी पक्ष नेत्याची टीका
विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. तांत्रिक अडचण ठीक समजू शकतो, पण बचाव कार्यासाठी दोन तास लागणे हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ असल्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. नैसर्गिक आपत्तीला हे सरकार तयार नसल्याचे दिसून येते अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
गर्दीमुळे मोनो रेल थांबली
एमएमआरडीएने सांगितले की, मोनोरेलची क्षमता 104 टन आहे. जास्त प्रवाशांमुळे म्हैसूर कॉलनीजवळ ट्रेन थांबली. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे टोइंग करता आले नाही. यामुळे अग्निशमन दलाला बचावकार्य करावे लागले. मुसळधार पाऊस आणि बंद रेल्वे मार्गांमुळे गर्दी वाढली.
