भुसावळ नगरपालिका निवडणूक : प्रारुप प्रभाग रचना जाहिर, हरकती मागवल्या

शहरात आता 25 प्रभागातून 50 नगरसेवक येणार निवडून : 31 पर्यंत हरकती मागवल्या


Bhusawal Municipality Election: Draft ward structure announced, objections sought भुसावळ (21 ऑगस्ट 2025) : पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीपूर्वी प्रारुप प्रभाग रचना पालिकेने जाहिर केली आहे. प्रारुप प्रभाग रचनेनुसार शहरात 25 प्रभाग तयार करण्यात आले आहेत. या प्रारुप रचनेवर नागरिकांच्या हरकती मागवल्या जात आहेत. मंगळवारपर्यंत पालिकेत हरकती दाखल झाल्या नाहीत, मात्र आगामी काळात हरकतींचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान प्रारुप प्रभाग रचनेवर यापूर्वी 21 ऑगस्टपर्यंत हरकती मागवल्या जाणार होत्या मात्र हरकतींच्या प्रक्रियेला दहा दिवस मुदवाढ देण्यात आली असून 31 ऑगस्टपर्यंत हरकती नोंदवता येणार आहे. यानंतर पूढील प्रक्रिया होईल.

पुढील प्रक्रिया राहणार अशी
पालिकेकडे प्रारुप प्रभाग रचनेवर आलेल्या हरकतींवर 1 ते 8 सप्टेंबर दरम्यान दाखल झालेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी सुनावणी घेतील. यानंतर 9 ते 11 सप्टेंबर दरम्यान सुनावणीनंतर हरकती नगर विकास विभागाकडे सादर होतील. 12 ते 18 सप्टेंबर दरम्यान प्राधिकृत केलेल्या अधिकार्‍यांनी अंतीम केलेली प्रभाग रचना नगरविकास विभागाकडे सादर होईल. 26 ते 30 सप्टेंबरच्या काळात राज्य निवडणूक आयोगाकडून अंतीम प्रभाग रचना अधिसूचनेव्दारे प्रसिध्द केली जाईल.






एक प्रभाग वाढला
पालिकेच्या सन 2016 च्या सार्वत्रिक निवडणूकीत शहरात 24 प्रभाग व 48 नगरसेवक होते. मात्र आगामी निवडणूकीत लोकसंख्येच्या आधारावर एक प्रभाग व दोन नगरसेवक वाढले आहेत. नवीन प्रारुप रचनेनुसार शहरात 25 प्रभाग असतील. प्रत्येक प्रभागातून एक- दोन ब्लॉक घेवून नवीन प्रभागाची निर्मिती झाली आहे. यामुळे वाढीव प्रभाग कोणत्या भागात वाढला, हे निश्चित नाही. 50 नगरसेवक, एक लोकनियुक्त नगराध्यक्ष असे 51 तर पाच ते सहा नामनिर्देशीत सदस्य राहू शकतील.

ओबीसींना 27 टक्के आरक्षण
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याचे आदेश दिले होते. यानुसारच आगामी निवडणूक होणार आहे. याच निर्णयानुसार पालिकेने सन 2022 ची प्रभाग रचना रद्द करन नव्याने रचना करुन प्रारुप आराखडा सादर केला आहे. पालिकेच्या आरक्षणानुसार ओबीसीसाठी 13, अनुसूचित जातीसाठी 8 जागा, एसटी अर्थात अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आरक्षीत राहतील. तर 50 टक्के जागांवर महिला राज राहिल.

नगराध्यक्ष आरक्षणावर राजकिय पक्षांचे लक्ष
पालिकेची निवडणूक भाजपचे मंत्री संजय सावकारे विरुध्द माजी आमदार संतोष चौधरी अशीच होईल. आगामी निवडणुकीत भाजपच्या विरुध्द महाविकास आघाडीचा प्रयोग होऊ शकतो. यासेाबतच चौधरी सर्व पक्षीयांची मोठ बांधून सर्वपक्षीय आघाडीतून निवडणूक लढवू शकतात, अशी शक्यताही राजकिय गोटातून वर्तवली जात आहे. यामुळे आगामी निवडणूक रंगतदार ठरणार आहे. यापूर्वी नगराध्यक्षपदाचे आरक्षण काय निघेल? यावरही राजकिय गणीते अवलंबून राहतील.

इच्छूकांचे गुडख्याला बाशींग
माजी नगरसेवकांचा मतदारांपर्यंत संपर्क वाढविणे तसेच या निवडणुकीत प्रथमच आपले नशिब आजमविणार्‍या नवागतांनीही मतदारांसोबत संपर्क वाढवला आहे. कोणत्याही पध्दतीने मतदारांसोबत संपर्क वाढविण्यासाठी इच्छूक प्रयत्नशिल आहेत. नागरिकांना मुलभुत सेवा सुविधांबाबत निर्माण होणार्‍या अणीअडचणी सोडविण्यावर भर दिला जात आहे. प्रारुप प्रभाग रचना जाहिर झाल्याने जातीय समीकरणांचा अभ्यासही सुरू करण्यात आला आहे.

31 पर्यंत हरकती नोंदवता येतील
प्रारुप प्रभाग रचना पालिकेने जाहिर केली असून यावर हरकतींची प्रक्रिया सुरु झाली आहे. 31 ऑगस्टपर्यंत यावर हरकती नोंदवता येतील. या हरकतींवर सुनावणी होऊन पुढील प्रक्रिया होईल, असे पालिकेचे उपमुख्याधिकारी शेख परवेज अहमद ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’शी बोलताना म्हणाले.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !