भोईवाडा भागातील बंद घर टार्गेट : 80 हजारांचा ऐवज चोरीला

अमळनेर (29 ऑगस्ट 2025) : अमळनेर शहरातील भोईवाडा परिसरात एका घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत 80 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवले. मंगळवारी सकाळी 10 वाजता घरफोडी उघडकीस आली. अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले अमळनेरात ?
ज्योतीबाई शामराव चौधरी (45, रा.भोईवाडा, अमळनेर) या आपल्या कुटुंबीयांसह राहतात. त्यांचे घर 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश केला. घरातून त्यांनी कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास केले. ज्योतीबाई घरी परतल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.