जळगाव गुन्हे शाखेच्या प्रभारी पोलिस निरीक्षकपदी राहुल गायकवाड
संदीप पाटील यांची नियंत्रण कक्षात बदली : पोलिस वर्तुळात खळबळ
गणेश वाघ
Rahul Gaikwad appointed as Police Inspector in-charge of Jalgaon Crime Branch भुसावळ (29 ऑगस्ट 2025) : जळगाव गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भटू पाटील यांची एलसीबी निरीक्षक पदावरून बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी प्रभारीपदी जिवाशा शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश शुक्रवारी सायंकाळी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी काढले आहेत.
राहुल गायकवाड नूतन प्रभारी
जळगावचे पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी शुक्रवारी सायंकाळी संदीप पाटील यांची एलसीबीच्या प्रमुख पदावरून उचलबांगडी करून त्यांना नियंत्रण कक्षात जमा केले तर जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी राहुल गायकवाड यांच्याकडे तूर्त एलसीबीची धूरा सोपवण्यात आली.





खुर्चीसाठी दरवेळी मोठी रस्सीखेच
जळगाव पोलिस दलातील पोलिस अधीक्षकांनंतर सर्वात मोठ्या सन्मानाची खुर्ची म्हणून एलसीबी निरीक्षकांकडे पाहिले जाते व ही खुर्ची मिळवण्यासाठी अधिकार्यांची मोठी चढाओढ दिसून येते व त्यामुळे राजकीय हस्तक्षेप यासाठी होत असल्याचा आरोपही अनेकदा केला जातो. खरे तर पोलिस महासंचालकांच्या आदेशानुसार आठ वर्ष सिनियर पीआय असलेल्या अधिकार्याला या खुर्चीवर प्राधान्याने संधी मिळायला हवी शिवाय या संबंधित अधिकार्याने तीन पोलिस ठाण्यात प्रत्येकी दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला असावा तसेच त्यांची न्यायालयीन चौकशी देखील सुरू असलेली नको आदी निकष आहेत.
‘नजन पाटील ठरले रिअल हिरो’
जळगाव एलसीबीची धूरा सांभाळताना अनेक अधिकार्यांना कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच पायउतार व्हावे लागले वा विविध आरोपांमुळे पद सोडावे लागले मात्र त्यास एकमेव अपवाद तत्कालीन निरीक्षक किसनराव नजन-पाटील ठरले. कार्यकाळ पूर्ण करून कुठलाही आरोप न होता अत्यंत सन्मानाने सेवानिवृत्त होण्याचे भाग्य त्यांना लाभले.
