जळगाव एमआयडीसी पोलिस ठाणे निरीक्षकासह चौघा कर्मचार्यांविरुद्ध गुन्हा
आर.के.वाईन्सप्रकरण प्रकरण पोलिसांच्या अंगाशी : आरोपींमध्ये जळगाव आर्थिक गुन्हे शाखेसह मुख्यालय, एमआयडीसी तालुका पोलिस ठाण्यातील कर्मचार्याचा समावेश
जळगाव : जळगावातील आर.के.वाईन्स प्रकरण एमआयडीसी निरीक्षकांसह चार कर्मचार्यांच्या चांगलेच अंगलट आले असून जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजित शिरसाठ यांच्यासह जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे नाईक संजय जगन्नाथ जाधव, आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन काशीनाथ पाटील, मुख्यालयातील मनोज केशव सुरवाडे, जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे भारत शांताराम पाटील या पाच जणांसह पती-पत्नी मिळून सात जणांविरूद्ध गुरूवारी जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्ह्याच्या पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. दारू वाहतूक प्रकरणात थेट अधिकारी व कर्मचार्यांचे साटेलोटे असल्याचे उघड झाल्यानंतर सुरूवातीला संबंधिताचे जवाब नोंदवल्यानंतर आता थेट गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ‘भ्रष्टाचार्यांची आता गय नाहीच’, असा सूचक इशाराही दिला आहे.
लॉकडाऊनमध्ये अवैधरीत्या झाली होती मद्य विक्री
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 12 एप्रिल रोजी पहाटे 4.15 वाजता अजिंठा चौकात टाटा इंडिगो (क्र.एम.एच.18 डब्लु 9842) ही आर.के.वाईन्स येथे येत असताना थांबवून त्यातून एक लाख 10 हजार 54 रुपये किंमतीचा वेगवेगळ्या कंपनीचा दारू जप्त केला होता. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी अमोल ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरुन नितीन शामराव महाजन (29, रा.अजिंठा हौ.सोसायटी, जळगाव), नरेंद्र अशोक भावसार (33, रा.अयोध्या नगर), दिनेश राजकुमार नोतवाणी (रा.आदर्श नगर, जळगाव), आर.के.वाईन्सचा व्यवस्थापक गणेश दिलीप कासार (30, रा. शिवाजी नगर), अनुज्ञप्तीधारक, दिशा दिनेश नोतवाणी (रा.आदर्श नगर, जळगाव) यांच्याविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने अहवाल पाठविल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी आर.के.वाईन्सचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला होता.





एसआयटीच्या चौकशीनंतर दाखल झाला गुन्हा
आर.के.वाईन्स प्रकरणात काही पोलिस कर्मचारीही सहभागी असल्याने तसेच त्यांचे धागेदोरे पाहता जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी खोलवर चौकशीकामी एसआयटी नेमली होती तसेच अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास व चौकशी स्वतंत्ररीत्या सुरू होती. या चौकशीत चार पोलिस कर्मचार्यांची नावे उघड झाली होती तसेच एमआयडीसी पोलिस निरीक्षक रणजीत शिरसाठ व कर्मचार्यांचा सहभाग आढळल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
एकूण आरोपींची संख्या झाली बारा
सुरुवातीला या प्रकरणातील नितीन शामराव महाजन, नरेंद्र अशोक भावसार, दिनेश राजकुमार नोतवाणी, गणेश दिलीप कासार, दिशा दिनेश नोतवाणी (अनुज्ञप्तीधारक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता तर गुरुवारी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रणजीत शिरसाठ, जिल्हा पेठ पोलिस ठाण्याचे नाईक संजय जगन्नाथ जाधव, आर्थिक गुन्हे शाखेचे जीवन काशीनाथ पाटील, मुख्यालयातील मनोज केशव सुरवाडे, जळगाव तालुका पोलिस ठाण्याचे भारत शांताराम पाटील यांच्यासह राजकुमार शीतलदास नोतवाणी (60, आदर्श नगर, जळगाव), सुधा राजकुमार नोतवाणी (55, आदर्श नगर, जळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.निलाभ रोहन करीत आहेत.
दारू प्रकरण पोलिसांच्या अंगलट
लॉकडाऊनमध्ये नशिराबाद येथील क्रिश ट्रेडर्सचे सील उघडून झालेली दारूची वाहतूक तसेच आर.के.वाईन्स प्रकरणात थेट पोलिस अधिकारी व कर्मचार्यांचे नाव आल्यानंतर जिल्हा पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली असून आता गुन्हा दाखल झाल्यानंतर दोषींवर मोठी कारवाई होणार असल्याची दाट शक्यता आहे.
