माजी मंत्री एकनाथराव खडसेंना दिलासा नाहीच ; मुख्यमंत्री म्हणाले, वरीष्ठ घेतात निर्णय


भुसावळ : विविध आरोपांच्या शुक्लकाष्टाच्या दिव्यातून बाहेर पडलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना महाजनादेश यात्रेनिमित्त जिल्ह्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांकडून न्याय मिळेल, अशी खडसेंच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना अपेक्षा असतानाही त्यांच्या पदरी पुन्हा निराशाच पदरी पडली. माजी मंत्री खडसेंना मंत्री मंडळात स्थान मिळणार का? या प्रश्‍नावर फडणवीस यांनी मंत्री मंडळात कुणाला घ्यायचे, राज्यात घ्यायचे की केंद्रात घ्यायचे याचे निर्णय मुख्यमंत्री घेत नसतात तर पक्षातील वरीष्ठ नेते घेत असतात, असे सांगून या प्रश्‍नाला बगल दिली. खडसे आमचे ज्येष्ठ नेते असून ते मार्गदर्शकही असल्याचे सांगण्यास मुख्यमंत्री विसरले नाहीत त्यामुळे खडसे समर्थकांची पुन्हा निराशाच झाली.

उदयनराजे भाजपात आल्यास आनंदच
उदयनराजे भोसले भाजपात आल्यास आपल्याला निश्‍चित आनंद होईल, असे मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले मात्र तो निर्णय त्यांचा असेल, असेही ते सांगण्यास विसरले नाहीत. लोकसभा निवडणुकीत युतीत ताणाताण झाली या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुकीतही आमची शंभर टक्के युती राहणार आहे, आता जनतेचा कौल आमच्या बाजूने असल्याने स्वतंत्र लढण्याचा विचार नसल्याचे ते म्हणाले.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल राधाकृष्णमध्ये शुक्रवारी रात्री मुक्कामी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी सकाळी 10.30 वाजता प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार हरीभाऊ जावळे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी केले.


कॉपी करू नका.