भुसावळातील पथ विक्रेता वादात माजी आमदार संतोष चौधरींची इन्ट्री : मध्यस्थीने सोडवले विक्रेत्यांचे उपोषण

चौघा उपोषणार्थीची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात उपचार


Former MLA Santosh Chaudhary’s entry into the street vendor dispute in Bhusawal: Mediation resolved the vendors’ hunger strike भुसावळ (13 सप्टेंबर 2025) : भुसावळातील अप्सरा चौकात पथ विक्रेते व दुकानदारांमध्ये अलीकडे छुपा संघर्ष वाढल्याचे दिसून आले. भाजपाचे माजी नगरसेवक निकी बतरा यांनी पथविक्रेत्यांच्या स्थलांतरासाठी उपोषण छेडताच व्यापारी पुढे सरसावल्यानंतर पालिकेने एक पाऊल मागे घेत नवरात्रोत्सवापूर्वी स्थलांतराचे लेखी आश्वासन दिले तर उपोषणाच्या दुसर्‍याच दिवशी पथ विक्रेत्यांनी पर्यायी जागेवर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासह दिवाळीपर्यंत आहे त्या जागेवरच व्यवसाय करू देण्यासाठी उपोषण छेडले. पालिकेने या उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यानंतर भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी इन्ट्री करीत पथ विक्रेत्यांशी संवाद साधत मध्यस्थी केली व आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले, दरम्यान, चार उपोषणार्थीची तब्येत खालावल्याने त्यांना उपचारार्थ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले.

पथ विक्रेत्यांवर उपासमारीचे संकट
भुसावळच्या शहरातील अप्सरा चौक ते वाल्मिक चौक दरम्यान गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे हातगाडीधारक (पथविक्रेते) यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. पालिकेतर्फे अप्सरा चौकातील पथविक्रेत्यांना तेथून काढून त्यांना आठवडे बाजारातील जागेवर स्थलांतरीत करण्याचे नियोजन केले आहे, मात्र, अद्यापही पालिकेकडून जागेवर काँक्रिटीकरण करण्यात आले नाही. माजी नगरसेवक निक्की बतरा व पिंटू ठाकूर यांनी उपोषण करून पथविक्रेत्यांना नवीन जागेत स्थलांतरीत करण्यात यावे, अशी मागणी केली होती मात्र बतरा व ठाकूर यांना पालिकेतर्फे लेखी आश्वासन दिल्याने त्याचे उपोषण मागे घेण्यात आले.


जागेचा प्रश्न लवकरच सुटणार
गुरुवारी सकाळी पथविक्रेता संघटनेचे अध्यक्ष राजू सपकाळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी उपोषण छेडल्यानंतर उपोषणस्थळी माजी आमदार संतोष चौधरी यांनी भेट देऊन तेथून मुख्याधिकारी राजेंद्र फताले यांच्याशी चर्चा केली. जागेचा प्रश्न सुटेल असे उपोषणार्थींना सांगितल्यावर उपोषण मागे घेण्यात आले.

चार जणांवर रूग्णालयात उपचार
उपोषणास बसलेले राजू सपकाळे, गोपाल पुरोहित, सागर ठाकूर आणि उज्ज्वला राजपूत यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर तेथे उपचार करण्यात आले. रक्तदाब कमी झाल्याने उपचारासाठी तेथे दाखल करण्यात आले असल्याचे राजू सपकाळे यांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !