सरदार पटेल जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करा : शिशिर जावळे यांची पंतप्रधानांकडे मागणी


भुसावळ (29 सप्टेंबर 2025) : भारताच्या अखंड एकतेचे शिल्पकार, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीला केंद्र सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी ठाम व सार्थ मागणी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश सचिव शिशिर दिनकर जावळे यांनी केली आहे.

पंतप्रधानांना दिले पत्र
या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सविस्तर आकडेपत्र पाठवून मागणी नोंदवली. देशाच्या संघटनामध्ये सरदार पटेलांचे योगदान केवळ ऐतिहासिकच नाही तर राष्ट्राला दिशादर्शक ठरलेले आहे. 562 संस्थानांचे विलिनीकरण करून अखंड भारताची निर्मिती घडवणारे ते खरे ‘भारत एकता पुरुष’ होते. त्यांच्या स्मरणदिनाला राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो, परंतु या दिवशी सार्वजनिक सुट्टी न जाहीर होणे हे मोठे दुर्लक्ष आहे, असे जावळे यांनी स्पष्ट केले.






एकता दिनाला द्यावा न्याय
राष्ट्रीय एकता दिनाला न्याय द्या असे, जावळे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे. देशात अनेक महापुरुषांच्या जयंतीला सुट्टी जाहीर केली जाते. स्वातंत्र्यवीर सरदार पटेल हे भारतीय इतिहासातील अद्वितीय पुरुष असून त्यांच्या स्मृतीसाठी राष्ट्रीय स्तरावर सुट्टी घोषित करणे ही खरी कृतज्ञता ठरेल. राष्ट्राला एकत्र आणणार्‍या महापुरुषाच्या जयंतीला विश्रांतीचा दिवस देणे म्हणजे देशवासीयांना त्यांचे योगदान आत्मसात करण्याची संधी देणे होय.

जनतेतून उमटत आहे पाठिंबा
भाजप ओबीसी मोर्चाचे कार्यकर्ते, सामाजिक संस्था तसेच नागरिकांनीही या मागणीला जोरदार पाठिंबा दर्शविला आहे. देशातील पुढील पिढीला सरदार पटेलांचा परिचय अधिक प्रभावीपणे करून देण्यासाठी अशा निर्णयाची गरज आहे

केंद्र सरकारने गांभीर्याने विचार करावा
भारताच्या अखंडतेचे रक्षण करणार्‍या या लोहपुरुषाला खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर सार्वजनिक सुट्टी हा सर्वोत्तम मार्ग आहे, असे सांगून जावळे यांनी केंद्र सरकारने त्वरित सकारात्मक पाऊल उचलावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. या मागणीमुळे आता राजकीय व सामाजिक वर्तुळात चर्चेला अधिक उधाण आले आहे व केंद्र सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !