यावलला स्मार्ट मीटरमुळे अवाजवी बिलांचा शॉक : राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराव
जबरदस्ती स्मार्ट मीटर बसवू देणार नाही : माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचा इशारा
Yavalla shocked by excessive bills due to smart meters: Executive engineers of the State Electricity Distribution Company surrounded यावल (29 सप्टेंबर 2025) : शहरातील वाणी गल्लीत असलेल्या राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्यासह नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता यांना घेराव घातला. शहरात नव्याने बसवलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य नागरीकांना अवाजवी आलेल्या बिल बाबत संताप व्यक्त करण्यात आला. तत्काळ स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवण्याची मागणी करण्यात आली. स्मार्ट मिटरच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात अन्यथा याहूनही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान, स्मार्ट मीटरची तपासणी केली जाईल अशी आश्वासन अधिकार्यांनी दिले.
काय घडले यावल शहरात ?
शहरातील वाणी गल्लीत राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयात सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या नेतृत्वात स्मार्ट मीटरचे अवाजवी आलेले बिल घेऊन मोठ्या संख्येत नागरिकांनी आंदोलन केले. उपकार्यकारी अभियंता सुहास चौधरी यांना घेराव घातला. अनेकांनी आपले जुने व नवीन वीज बिल या ठिकाणी त्यांच्यासमोर सादर केले व त्यांना निवेदन देण्यात आले. यात त्यांनी म्हटले आहे की, शहरात दोन-तीन महिन्यापासून नवीन स्मार्ट मीटर विद्युत वितरण कंपनीमार्फत बसवले गेले आहे. हे स्मार्ट मीटर जास्त फिरत असून त्यामुळे शहरातील नागरिकांना वीज बिले हे जास्तीचे येत असून अवाजवी वीज बिले येत असल्याची तक्रार केली.





जुने वीज मीटर लावण्याची मागणी
विजेचा कमी वापर करूनही मोठ्या प्रमाणावर बिल आले असून मोठ्या प्रमाणावर आलेले बिल सर्वसामान्य ग्राहक भरू शकत नाही तसेच स्मार्ट मीटर संदर्भात नागरिकांच्या प्रचंड तक्रारी असल्यामुळे सदर स्मार्ट मीटर काढून पूर्वीचे जुनेच मीटर लावण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. प्रसंगी भरत भोई, जुगल घारू, सागर कोळी, नरेंद्र शिंदे, गोलू माळी, कृष्णा चौधरी, राहुल कचरेसह मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती.
