भुसावळ पालिका निवडणूक : एस.सी.आरक्षणामुळे भाजपातर्फे रजनी सावकारेंना संधी ? ; महाविकास आघाडीचा उमेदवार 9 रोजी ठरणार !


गणेश वाघ
Bhusawal Municipality Election : Will Rajni Savkare get a chance from BJP due to SC reservation?; Mahavikas Aghadi’s candidate will be decided on the 9th! भुसावळ (6 ऑक्टोबर 2025) : नाशिक विभागात एकमेव ‘अ’ वर्ग पालिका असलेल्या भुसावळसाठी नगराध्यक्षपदासाठी आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते? यासाठी इच्छूकांनी देव पाण्यात टाकले होते. अनेकांनी दोन वर्षांपासून सामाजिक गणितांच्या आधारावर लॉबींग करीत ‘आपल्यालाच तिकीट’ मिळणार, अशी हवादेखील निर्माण केली व दर पंधरा दिवसांनी विविध उमेदवारांच्या नावाभोवती ही हवा फिरत राहिली मात्र प्रत्यक्षात सोमवारी जाहीर झालेल्या आरक्षणानंतर इच्छूकांचा पुरता हिरमोड होवून त्यांना आपल्या स्वप्नांवर पाणी फेरावे लागले.

भुसावळात भाजपातर्फे रजनी सावकारेंना संधी !
मुंबईत नगरपरिषदांच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदांची आरक्षण सोडत निघाल्यानंतर भुसावळसाठी नगराध्यक्षपद हे अनुसुचित जाती प्रवर्गाच्या महिलांसाठी राखीव झाल्यानंतर आता भुसावळच्या राजकीय समीकरणात आगामी काळात मोठा बदल पहायला मिळणार आहे. या पदासाठी भाजपाकडून विद्यमान आमदार व मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचे नाव पुढे आले असून त्यांना पक्षाचे तिकीट फायनल असेल, अशी खास सूत्रांची माहिती आहे. त्या शिवाय मंत्री सावकारे यांच्या वहिनी पल्लवी प्रमोद सावकारे यांच्या नावाचाही ऐनवेळी विचार होवू शकतो, अशीदेखील चर्चा आहे.






महाविकास आघाडी 9 रोजी उमेदवार जाहीर करणार
भुसावळात भाजपाला निवडणुकीसाठी तगडे आव्हान माजी आमदार संतोष चौधरी यांचे असणार आहे. चौधरी यावेळी पक्षातर्फे लढतात की आघाडी करून लढतात? यावरही अनेक गणिते अवलंबून आहेत. माजी आमदार संतोष चौधरी भूमिका मांडताना म्हणाले की, शहरात गेल्या पाच वर्षात कशा पद्धत्तीने व कोणाचा विकास झाला आहे? हे सुज्ञ जनतेला ठावूक आहे. आमच्याकडे तगडा उमेदवार असून 9 रोजी आम्ही त्याचे नाव जाहीर करू.

डॉ.मधू मानवतकर उतरणार रिंगणात !
भुसावळातील प्रथितयश डॉ.राजेश मानवतकर यांच्या सुविद्य पत्नी डॉ.मधू मानवतकरदेखील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील प्रबळ उमेदवार असतील. अद्याप त्या कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करतील? हे स्पष्ट नसलेतरी त्या निवडणुकीत उतरणार हे स्पष्ट असल्याचे डॉ.मानवतकर यांनी सांगितले. अलीकडील विधानसभा निवडणुकीत डॉ.राजेश मानवतकर हे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार होते. प्रबळ राजकीय पाठिंबा नसतानाही त्यांनी एकट्याच्या जोरावर तब्बल 60 हजार मते मिळवली होती मात्र या निवडणुकीत आमदार संजय सावकारे हे विजय मिळवला होता.

महायुतीच्या भूमिकेकडे लागले लक्ष
राज्यातील महायुतीत सहभागी असलेली शिंदे सेना तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाची भूमिका भुसावळातील निवडणुकीबाबत काय असेल? हे अद्याप अस्पष्ट आहे. महायुती मिळून निवडणूक झाल्यास ते भाजपासाठी सोयीचे ठरू शकते मात्र तीन्ही पक्षांनी स्वतंत्र लढत दिल्यास विरोधकांना त्याचा निश्चित फायदा होईल, यात शंका नाही.

भुसावळ मतदारसंघ आरक्षीत
भुसावळ विधानसभा मतदारसंघ देखील सन 2009 पासून अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. तिथून विद्यमान आमदार संजय सावकारे हे सातत्याने निवडून येत आहेत.

चुरशीची होणार निवडणूक
भुसावळातील प्रत्येक निवडणूक ही चुरशीची होत असल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूकदेखील चुरशीची होईल यात शंकाच नाही. प्रमुख पक्षांतर्फे इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केली असलीतरी अद्याप अनेक नवीन चेहरेही रिंगणात राहण्याची दाट शक्यता आहे. नेत्यांनी त्या दृष्टीने सोशल मिडीयावर लॉबींग चालवले आहे. अंतीम रिंगणातील उमेदवार स्पष्ट होण्यास अद्याप मोठा अवधी आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !