लव्ह जिहादच्या संशयावरून जळगावात तरुणाला मारहाण ; दुचाकीही पेटवली

Youth beaten up in Jalgaon on suspicion of love jihad; bike also set on fire जळगाव (12 ऑक्टोबर 2025) : जळगावातील तरुणाला टोळक्यानेा मारहाण केली तसेच त्याची दुचाकी पेटवून दिली. लव्ह जिहादच्या संशयातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मोहाडी रस्त्यावरील पतंजली शॉपजवळ घडलेल्या घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
असे आहे नेमके प्रकरण ?
जखमी शेख समीर शेख सलीम (27, रा.शिवाजीनगर, जळगाव) याच्या तक्रारीनुसार, नोकरीच्या कामासाठी तो व त्याची भुसावळला कॉलेजमध्ये एमएस्सीच्या दुसर्या वर्षाला असलेली मैत्रीण शनिवारी सकाळी साडेदहाला जळगावात अॅक्टिव्हा मोपेडने (एम.एच.19 सी.एल.4962) भुसावळहून जळगावला आले.
भूक लागल्याने काहीतरी खाण्यासाठी जळगावच्या शिरसोली नाक्यावरून मोहाडी रस्त्यावरील पतंजली शॉपजवळ थांबले. त्यावेळी पल्सरवर आलेल्या संशयित तरुणाने त्याला आमच्या धर्माच्या मुलीला घेऊन फिरतो का? असे म्हणून शिविगाळ करत मारहाण केली. त्यानंतर आणखी सात ते आठ जणांनी खाली पाडून बेदम मारहाण केली आणि दुचाकीची तोडफोड केली.
मारहाण प्रकरणी शेख समीरच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसात संशयित किशोर रवींद्र जाधव (रा.समतानगर), भरत वासुदेव बेंडाळे (नेहरूनगर) व गणेश महादू गवळी (रा.मोहाडी) व अन्य चार अनोळखींविरुद्ध बेकायदा उद्देशाने पाच पेक्षा अधिक व्यक्ती जमून दंगल घडवणे, दुखापत करणे, 20 हजारांपेक्षा अधिकच्या मूल्याच्या संपत्तीचे नुकसान करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनास्थळावर शेख समीरची दुचाकी पेटवून देण्यात आली. मनपाचा अग्निशमन बंब दाखल होईपर्यंत दुचाकी जळून खाक झाली.
