वाळू माफियांचा हैदोस : जळगावात तलाठ्यावर जीवघेणा हल्ला

अवैध वाळू जीवावर: ट्रॅक्टरच्या चाकाखाली टाकण्याचा केला प्रयत्न


Sand mafia’s heist: Fatal attack on Talathi in Jalgaon जळगाव (11 ऑक्टोबर 2025) : वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठ्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली तसेच तलाठ्याला ट्रॅक्टरवरून खाली खेचत चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. जळगावच्या चोपडा तालुक्यातील बुधगाव येथे हा प्रकार घडला. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू मोठ्या प्रमाणावर तापली असून नूतन जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तलाठ्यावर प्राणघातक हल्ला
अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी चोपडा तालुक्यातील बुधगाव येथील नदी पात्रात महसूल विभागाचे पथक गेले असता काही ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करीत होते व पथक आल्याचे कळताच इतर वाहने अंधाराचा फायदा घेत तिथून पसार झाले मात्र एक ट्रॅक्टर पथकाच्या हाती लागला. यावेळी तलाठी ट्रॅक्टरवर बसले मात्र चालक आणि मालकाने खाली खेचत चाकाखाली टाकण्याचा प्रयत्न केला. यात तलाठी गंभीर जखमी झाले. तलाठ्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून चोपडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे प्रकरण
चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात म्हणाले की, बुधगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त माहिती प्रशासनाला मिळाली. त्या माहितीच्या आधारे मंडल अधिकारी, तलाठी आणि इतर पाच कर्मचारी त्या ठिकाणी गेले. घटनास्थळी काही वाहने होती मात्र अंधाराचा फायदा घेऊन ती पसार झाली. मंडल अधिकारी आणि तलाठ्यांच्या हाती यावेळी एक ट्रॅक्टर लागला. तो तहसीलदार कार्यालयाकडे घेऊन येत असताना त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला.

ज्या ठिकाणी घटना घडली आहे त्या ठिकाणी वाळू उपशाला कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. या आधीही एका नायब तहसीलदार यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यामुळे अवैध पद्धतीने वाळू उपसा करणार्‍यांवर जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली कडक कारवाई करण्यात येईल.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !