यावल बाजार समितीत मका खरेदीत अचानक दर कमी केल्याने शेतकरी संतप्त ; व्यापार्यांची पिळवणुकीची तक्रार
Farmers angry over sudden reduction in maize purchase price at Yaval Market Committee; Traders complain of exploitation यावल (15 ऑक्टोबर 2025) : यावल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व्यापार्यांनी एकजूट करीत शेतकर्यांची पिळवणूक केल्याची तक्रार केली आहे. सोमवारी या ठिकाणी मक्याचा दर प्रतिक्विंटल एक हजार 531 रुपये होता तर मंगळवारी तोच दर व्यापार्यांनी संगणमत करून घसरून थेट एक हजार 100 पर्यंत आणल्याचा आरोप शेतकर्यांनी केला. प्रचंड गोंधळ उडाल्याने सायंकाळी थेट बोली थांबवण्यात आली. बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालकांनी येथे येवुन शेतकर्याच्या अडचणी समजुन घेत व्यापार्यांना योग्य भाव व बोली लावण्याच्या सुचना केल्या व दर का कमी केले याबाबत थेट नोटीसा बजावण्याचे आदेश सभापतींनी दिले
शेतकर्यांनी थांबवली खरेदी
यावल बाजार समितीच्या मुख्य आवारात सध्या शेतकर्यांकडून व्यापारी वर्गातून मका खरेदी केला जात आहे. बोली लावून मका खरेदी होत आहे. सोमवारी मक्याला प्रतिक्विंटल एक हजार 531 रुपयाचा भाव मिळाला होता व मंगळवारीदेखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी आपला मका आणला होता मात्र येथील व्यापार्यांनी व आडत दुकानदारांनी संगणमत करून सुरुवातीला एक हजार 451 रुपये दराने काही शेतकर्यांचा मका खरेदी केला. दुपारी एकदम मक्याचे भाव घसरले व एक हजार 100 रुपये दराने मक्याची मागणी शेतकर्यांकडे होऊ लागली, असा आरोप शेतकरी जयप्रकाश देशमुख, विशाल शिर्के, अशोक बारी, मोरेश्वर फेगडे, गणेश शिर्के, महेश उंबरकर यांनी केली. व्यापारी संगणमत करून एक हजार 100 रुपयावरून केवळ शंभर रुपये वाढ करून भाव वाढवत होते त्यामुळे शेतकर्यांची चांगलीच कोंडी झाली म्हणून शेतकर्यांनी संतप्त होत खरेदीच थांबवली.





याची माहिती सभापती राकेश फेगडे, उपसभापती बबलु कोळी, संचालक सुर्यभान पाटील, व्यापारी प्रतिनिधी तथा संचालक अशोक चौधरी, सचिव स्वप्निल सोनवणे यांना देण्यात आली. त्यांनी तातडीने त्या ठिकाणी बाजार समितीत दाखल होत शेतकर्यांशी संवाद साधला व व्यापार्यांना शेतकर्यांची अडवणूक न करता योग्य बोली व भाव जाहीर करावा अशा सूचना केल्या व सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पुन्हा लिलाव प्रक्रिया सुरळीत झाली.
