भुसावळातील नाहाटा महाविद्यालयाचे महादेव माळ येथे ‘खेड्याकडे चला अभियान’
‘Go to the Villages’ campaign at Mahadev Mal of Nahata College in Bhusawal भुसावळ (15 ऑक्टोबर 2025) : शहरातील भुसावळ कला, विज्ञान आणि पु.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील नियोजन अभ्यास मंडळ व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ’खेड्याकडे चला अभियानाअंतर्गत’ स्वच्छता अभियान महादेव माळ येथे बुधवार, 15 रोजी आयोजित करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी ग्राम स्वच्छता अभियान राबवून त्याद्वारे महादेव माळ येथील जि. प. शाळा परिसर तसेच रस्त्यांची साफसफाई केली. स्थानिक मंदिराजवळचा परिसरही स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर येथील वन उद्यान येथे व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष व अभियानाचे उद्घाटक म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच. बर्हाटे, प्रमुख वक्ते प्रा.डॉ.पी.ए.अहिरे, जि.प. शाळेचे मुख्याध्यापक निलेश पाटील सर, नियोजन मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. एस. टी. धुम, व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. किरण वारके, संगणक विभागातील श्री. नारखेडे, स्थानिक जि. प. शिक्षिका मीनाक्षी पाटील आदी उपस्थित होते.





यावेळी आपल्या भाषणात प्रमुख वक्ते प्रा. डॉ. पी.ए. अहिरे यांनी महात्मा गांधीजींच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला. यावेळी त्यांनी असे सांगितले की, साधारण 1920 नंतर महात्मा गांधी यांचा काळ सुरू होतो. आपल्या कार्यकाळात महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा व समर्पण हे तत्व स्वीकारले आणि सनदशीर मार्गाने न घाबरता स्वातंत्र्याचा लढा सुरू केला व जगासमोर एक आदर्श प्रस्थापित केला.
ग्रामीण भागाला त्यांनी अत्यंत महत्त्वाचे स्थान दिलेले दिसून येते. ग्रामीण भागाला न्याय मिळण्यासाठी व गरिबीचे उच्चाटन करण्यासाठी त्यांनी खेड्याकडे चला हा मूलमंत्र भारतीय जनतेला दिला. गावांना स्वयंपूर्ण बनवण्याचा मार्ग त्यांनी दाखवला. ग्रामीण भागाची माहिती भारतातील तरुणांना करून देण्यासाठी त्यांनी खेड्यांना स्वयंपूर्ण बनवण्याचे आवाहन केले. महात्मा गांधी यांच्या मते, आपल्या देशातील कुशल व अकुशल कारागीर दुसर्यांवर अवलंबून राहू नये व खेडे ओस पडू नये म्हणून स्वयंपूर्ण खेड्यांची निर्मिती करणे आवश्यक आहे. महात्मा गांधी यांनी स्वदेशी चळवळ सुरू करतानाच श्रम प्रतिष्ठेलाही महत्त्व दिले व आपल्या कृतीतून ते सिद्धही केले. देशाचा पैसा देशातच कसा राहील या दृष्टिकोनातून त्यांनी विचार मांडलेले दिसून येतात. त्यांनी सत्याचा स्वीकार केला त्याच्या अहिंसा या तत्त्वामुळे ब्रिटिशही त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. आपल्या जीवन काळात महात्मा गांधी यांनी निसर्ग वादाला महत्त्व दिले. शाळांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी स्वतः आर्थिक स्वायत्तता जपण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शिक्षणाद्वारे विचारशक्ती, बुद्धिमत्ता, सहृदयता म्हणजेच प्रेमपूर्वक व्यवहार व हस्त कौशल्याचा विकास आदी गुण विकसित होणे आवश्यक असण्यावर भर दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एच. ब-हाटे यांनी खेड्याकडे चला अभियानाचे महत्त्व स्पष्ट करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. आणि भविष्यात महाविद्यालयातील जास्तीत जास्त स्टाफ व विद्यार्थ्यांना सामावून घेऊन येथे पुन्हा एक दिवसीय कार्यक्रम गावकर्यांसोबत घेण्याची इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ. एस.टी. धूम यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. किरण वारके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. जी. आर. वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विभागातील प्रा. डॉ. जितेंद्र आडोकार, प्रा सुनील अडकमोल, प्रा. प्रिया लोहार, प्रा. जोगेश्वरी पाटील यांनी उपस्थित राहून परिश्रम घेतले. तसेच महादेव माळ्याच्या ग्रामस्थांनी सहकार्य केले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील विद्यार्थी तसेच स्थानिक जि.प. हायस्कूल चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
