‘अंतर्नाद प्रतिष्ठान’चा दीपोत्सवात वाटीभर फराळाचा आनंद पाड्यावर
भुसावळ (16 ऑक्टोबर 2025) : भुसावळ येथील अंतर्नाद प्रतिष्ठान गेल्या दहा वर्षांपासून दीपोत्सवाच्या निमित्ताने वंचित कुटुंबांपर्यंत आनंद पोहोचवण्याचे कार्य सातत्याने करत आहे. या वर्षीही “वाटीभर फराळ द्या आणि वंचितांचे तोंड गोड करा” या संकल्पनेतून संस्थेने फराळ, नवीन कपडे, शालेय साहित्य आणि किराणा साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे.
सन २०१६ मध्ये “समाजासाठी काहीतरी देण लागतो” या भावनेतून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली. पहिल्या वर्षी चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी येथे सुरुवात झाली आणि त्यानंतर दरवर्षी वेगवेगळ्या दुर्गम वस्त्यांवर दीपोत्सव साजरा करण्यात आला. जोगलखोरी, जुनी मोहमांडली, काळाडोह, मोर धरण, विटवा, आसराबारी, जामुन झिरा, डोंगरदे, गायरान, नागदेवी, लसणीबर्डी अशा अनेक आदिवासी वस्त्यांवर आनंदाचा दिवा पेटवण्यात आला आहे.





यंदा उपक्रमाचे दहावे वर्ष असून, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या यावल तालुक्यातील माथन या आदिवासी पाड्यावर २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता हा उपक्रम पार पडणार आहे. शहरातील दात्यांकडून फराळ, सुस्थितीतील जुने कपडे, नवे कपडे, चपला, बूट, शालेय साहित्य आणि किराणा गोळा करून तिथेच दिवाळी साजरी केली जाणार आहे.
दरवर्षी मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यंदा उपक्रम अधिक व्यापक करण्याचा निर्णय स्वयंसेवकांनी घेतला आहे. आर्थिक सहभाग शक्य नसले तरी देण्याचा आनंद अनुभवायचा असेल, तर स्वच्छ धुतलेले व इस्त्री केलेले कपडे, नवे कपडे, शालेय साहित्य, दप्तर, स्वेटर, ब्लॅंकेट इत्यादी वस्तू प्रतिष्ठानकडे द्याव्यात, असे आवाहन प्रकल्प प्रमुख जीवन महाजन, समन्वयक योगेश इंगळे, सह-समन्वयक प्रसन्ना बोरोले आणि समाधान जाधव यांनी केले आहे.
गेल्या वर्षी या उपक्रमातून जवळपास ४५० नागरिकांना फराळासह कपडे, चपला, शालेय साहित्य, साखर व तांदूळ वितरित करण्यात आले होते. यंदाही त्या कामाला अधिक व्यापकता देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मदत करणाऱ्यांनी आपले साहित्य १८ ऑक्टोबरपर्यंत प्रतिष्ठानकडे सुपूर्त करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमात अमितकुमार पाटील, ज्ञानेश्वर घुले, प्रदिप सोनवणे, डॉ. संजू भटकर, शैलेंद्र महाजन, कुंदन वायकोळे, राहुल भारंबे, विक्रांत चौधरी, हितेंद्र नेमाडे, अमित चौधरी, देव सरकटे, राजू वारके, डॉ. प्रा. श्याम दुसाने, तेजेंद्र महाजन, भूषण झोपे, उमेश फिरके, विपिन वारके, चंद्रकांत सूर्यवंशी, ललीत महाजन, शिरीष कोल्हे, कपिल धांडे, केतन महाजन, प्रमोद पाटील, हरीश भट, निवृत्ती पाटील, सचिन पाटील, जीवन सपकाळे आणि मंगेश भावे, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील परिश्रम घेत आहेत.
