रावेर नगरपरिषदेला ५२ लाखांची अभ्यासिका मंजूर : आमदार अमोल जावळे यांच्या प्रयत्नांना यश
रावेर (16 ऑक्टोबर 2025) : नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी शासनाकडून देण्यात येणाऱ्या विशेष अनुदान योजनेअंतर्गत रावेर नगरपरिषदेसाठी ५२ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून अत्याधुनिक अभ्यासिका उभारण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षार्थ्यांना एक सुसज्ज अध्ययन केंद्र मिळणार आहे.
रावेर शहरात दर्जेदार आणि शांत वातावरणातील अभ्यासिकेची आवश्यकता अनेक वर्षांपासून जाणवत होती. शहरातील विद्यार्थ्यांना आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांना योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पाठपुराव्यामुळेच शासनाने हा निधी मंजूर केला आहे.





अमोलभाऊ जावळे यांना स्वतःलाही शिक्षण आणि अभ्यास याबाबत विशेष आकर्षण आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सक्षम पायाभूत सुविधा मिळाव्यात, ही त्यांची भूमिका कायम राहिली आहे. या अभ्यासिकेमुळे रावेर व परिसरातील युवकांना शैक्षणिक प्रगतीसाठी मोठा आधार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या मंजुरीमुळे रावेर शहरात समाधान व्यक्त होत असून, नागरिक आणि विद्यार्थी वर्गाने आमदारांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आहे. लवकरच ही अभ्यासिका अत्याधुनिक सोयीसुविधांसह ज्ञानकेंद्र म्हणून उभारली जाणार आहे.
