स्काउट्स अॅण्ड गाईड्सतर्फे स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरात 42 विद्यार्थिनींचा सहभाग
भुसावळ (31 ऑक्टोबर 2025) : भारतीय स्काउट्स अॅण्ड गाईड्सच्या राष्ट्रीय मुख्यालयामार्फत मध्य रेल्वे राज्य स्काउट्स अॅण्ड गाईड्सकडे मार्गदर्शिका व रेंजर्ससाठी राष्ट्रीय स्तरावरील स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. यात शिबिरात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांतील एकूण 42 मार्गदर्शिका व रेंजर्स विद्यार्थिनींनी उत्साहपूर्वक सहभाग नोंदविला. राज्य मुख्य आयुक्त / प्रधान मुख्य कर्मचारी अधिकारी (मध्य रेल्वे) यांच्या मान्यतेने हे शिबिर भुसावळ विभागातील स्काउट्स अॅण्ड गाईड्स जिल्हा प्रशिक्षण केंद्र येथे 25 ते 29 ऑक्टोबर दरम्यान यशस्वीरीत्या पार पडले.
डीआरएम यांची उपस्थिती
या प्रशिक्षण शिबिराचा मुख्य उद्देश तरुण मुलींना आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे रक्षण करण्यास सक्षम बनविणे आणि आत्मविश्वास वाढविणे हा होता. शिबिराच्या समारोपास डीआरएम पुनीत अग्रवाल अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासह जिल्हा मुख्य आयुक्त तथा अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) सुनील कुमार सुमन, उपसंचालिका सुरेखा श्रीवास्तव, जिल्हा आयुक्त (स्काउट) तथा वरिष्ठ डीईई (टीआरडी) सौरभ गोयल, वरिष्ठ शाखा अधिकारी आणि स्काउट्स अॅण्ड गाईड्सचे पदाधिकारी उपस्थित होते.समारोप प्रसंगी मान्यवरांनी सहभागी मुलींना स्वसंरक्षणाचे महत्त्व पटवून देत आत्मनिर्भरतेचा संदेश दिला. या शिबिराचे यशस्वी आयोजन भुसावळ विभागीय स्काउट्स अॅण्ड गाईड्सतर्फे केले होते.





