भुसावळात अनुसूचित जमाती प्रमाणपत्रासाठी कोळी जमातीचे धरणे आंदोलन
विविध मागण्यांचे निवेदन : बुधवारपासून बेमुदत उपोषणाचा इशारा
Koli tribe holds sit-in protest for Scheduled Tribe certificate in Bhusawal भुसावळ (4 नोव्हेंबर 2025) : कोळी समाजाला ढोर, टोकरे कोळी, कोळी महादेव, मल्हार या अनुसूचित जमातींना जात प्रमाणपत्र मिळण्यासह विविध मागण्यांसाठी आदिवासी टोकरे कोळी जमातीने शहरातील प्रांताधिकारी कार्यालयात सोमवारपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास दोन दिवस धरणे आंदोलन करुन बुधवारपासून 5 नोव्हेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनाला समाजबांधवांनी प्रतिसाद देवून प्रांताधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
या मागण्यांसाठी आंदोलन
प्रवर्तन बहुउद्देशीय संस्था जळगाव व आदिवासी टोकरे कोळी परिषद जळगाव यांनी या भागातील कोळी समाजबांधव हे वतनदार कोळी नसून कोळी ढोर, टोकरे कोळी आहे. याबाबत 266 पानांचे बुकलेट सहपत्रे पुरावे सादर केले आहे. असे असतानाही प्रांताधिकारी कार्यालयाने कोणत्याही प्रकारे कार्यवाही न करता बेकायदेशिरपणे कर्तव्यात कसूर करुन अहवाल प्रलंबीत ठेवला आहे. त्या अहवालावर सकारात्मक निर्णय घ्यावा, ज्या अर्जदारांच्या रक्ताच्या नातेवाईकांना अनूसूचित जमातीचे जमात प्रमाणपत्र आधीच मिळाले असतील, त्या जमता प्रमाणपत्राला प्रथमदर्शी पुरावा ग्राह्य धरुन अर्जदाराने दावा केलेल्या अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, ज्या अर्जदाराकडे इनाम वर्ग सहा ब किंवा आदिवासी खातेदार महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम 1966 चे कलम 36 व 36 अ प्रमाणे बंधनास पात्र अशी नोंद असल्यास ती नोंद ग्राह्य धरुन अर्जदाराने दावा केलेल्या अनुसूचित जमतीचे जमात प्रमाणपत्र त्वरीत द्यावे आदींसह प्रमुख सहा मागण्यांसाठी साकरी येथील विजय मोरे व जाडगाव येथील गणेश कोळी यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले.





तर बेमुदत उपोषणाचा इशारा
दोन दिवसांत दखल न घेतल्यास बुधवारपासून बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. या साखळी आंदोलनाला कोळी समाज बांधवांनी पाठींबा दर्शविण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयसमोर निदर्शने करुन प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी शहरासह तालुका व विभागातून समाजबांधवांनी उपस्थिती दिली. या प्रकरणी आता प्रशासनाकडून किती मागण्यांवर आश्वासन दिले जाते? याकडेही लक्ष लागून आहे.
तर प्रतिज्ञापत्र घेवून प्रमाणपत्र द्या
कोळी इनाम धारकांना महाराष्ट्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र (देण्याचे व पडताळणी विनीयमन) महा. क्रमांक 23 नियम 3 क ते च मधील पुरावे अर्जदार सादर करु शकला नाही तर अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र घेवून अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांही निवेदनातून करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत मागण्यांची पूर्तता होत नाही, तोपर्यंत साखळी धरणे आंदोलन व पुढील काळात बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.
