बाबा मला मारले म्हणून दिल्लीला ! उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेवर सडकून टीका


Dad killed me and I went to Delhi! Uddhav Thackeray criticizes Eknath Shinde मुंबई (20 नोव्हेंबर 2025) : भाजपाने शिंदे गटातील पदाधिकारी फोडल्याचा वाद राज्यात रंगत असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्नी दिल्ली दौरा करीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या प्रकारावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलीच टीका केली. महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेकडून गुरुवारी डिजिटल बोर्डचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्ताधारी महायुतीत एकमेकांच्या नसा आवळण्याचे काम सुरू झाले आहे त्यामुळे एक कुणीतरी गेलंय, बाबा मला मारले म्हणून दिल्लीला. या दिवट्यांना मशालीचे महत्त्व कळणार नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली.

काही दिवट्यांना कळणार नाही महत्व !
आयुष्यात चांगले शिक्षक व चांगले शिक्षण मिळाले नाही तर काय होते हे आपण पाहतो. उदाहरणार्थ, दिवटी म्हणजे मशाल आणि दिवटा म्हणजे… त्यामुळे असे जे काही दिवटे निघालेत त्यांना मशालीचे महत्त्व कळणार नाही आणि कळणारही नाही. ही मराठी भाषेची गंमत आहे. आता मी पण आमदार आहे. सगळे आमदार, खासदार आपला फंड वापरतात. पण हा फंड विरोधी पक्षाच्या आमदार, खासदारांना देताना हात आखडता घेतला जातो. त्यांच्या आर्थिक नाड्या आवळल्या जातात. हे सर्व आपण बातम्यांमध्ये वाचतो. पण आता कहर म्हणजे, त्यांच्यातच एकमेकांच्या नसा आवळण्याचे काम सुरू झाले आहे. एक कुणीतरी गेलंय बाबा मला मारले म्हणून दिल्लीला. ही लाचारी का? तर तेच की, त्या वयात चांगले शिक्षक मिळाले असते तर ही वेळ आलीच नसती, असेही ठाकरे म्हणाले.

सोनम वांगचुक यांना तुरुंगात डांबले
उद्धव यांनी यावेळी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेवरूनही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, मध्यंतरी मी सोनम वांगचुक यांचा एक कार्यक्रम पाहिला. आपल्या देशात चांगले शिक्षक व शिक्षण मिळाले नाही, तर चांगल्या लोकांना सुद्धा देशद्रोही ठरवून तुरुंगात टाकले जाते याचे सोनम वांगचुक हे उत्तम उदाहरण आहे. ते काय म्हणत आहेत याकडे दुर्लक्ष करून त्यांच्या कपाळावर नको तो शिक्का मारून त्याला आतमध्ये टाकण्यात आले. आता ते किती दिवस आतमध्ये सडतील हे देवजाणे.

मराठवाड्यातील महिला शेतकर्‍याचा सांगितला किस्सा
उद्धव ठाकरे यांनी यावेळी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांनी त्यांच्यापुढे मांडलेल्या व्यथाही सांगितल्या. ते म्हणाले, एका महिला शेतकर्‍याने सांगितले की, सरकार मुलींना मोफत शिक्षण असल्याचे सांगते. पण प्रत्यक्षात शाळेत गेल्यानंतर फिस भरावी लागते. आमच्या घरात आता काही उरले नाही. आम्ही मुलींना शिकवायचे कसे? ही महिला अत्यंत उद्वेगाने बोलत होती. त्याच्या डोळ्यात राग होता. द्वेष होता. शल्यही होते. त्यावेळी त्या महिलेच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शिवसेनेने घेतली. त्या महिलेने केवळ आपल्या मुलीचे नव्हे तर संपूर्ण गावच्या मुलींचे दुःख सांगितले होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !