भुसावळात ईव्हीएम प्रशिक्षणाला दांडी : 41 कर्मचार्‍यांना ‘शो कॉज’


EVM training disrupted in Bhusawal: ‘Show cause’ issued to 41 employees भुसावळ (21 नोव्हेंबर 2025) : भुावळ पालिका निवडणुकीसाठी नेमलेल्या 842 कर्मचार्‍यांचा पहिला प्रशिक्षण वर्ग गुरुवारी भुसावळात पार पडला. या प्रशिक्षणास दांडी मारणार्‍या 41 कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, नोटीस मिळताच 24 तासांच्या आत संबंधितांना खुलासा करावा लागणार आहे.

दोन सत्रात प्रशिक्षण
ताप्ती स्कूल दोन सत्रात झालेल्या या प्रशिक्षणात प्रांत तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, नायब तहसीलदार संतोष विनंते यांनी मार्गदर्शन केले. प्रामुख्याने इव्हीएम हाताळणीवर भर देण्यात आला. सुरुवातीला मतदान व मतमोजणी प्रक्रियेचे मुलभूत नियम, आचारसंहितेतील तरतुदी, मतदान केंद्रावरील शिस्तीची माहिती दिली.



ईव्हीएम हाताळणीचे प्रशिक्षण
सुरुवातीला मतमोजणी आणि मतदान प्रक्रियेचे मूलभूत नियम, आचारसंहितेतील तरतुदी तसेच मतदान केंद्रावरील शिस्त व नियोजनाबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर ईव्हीएम मशीनची रचना, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट यांच्यामधील तांत्रिक जोडणी याचे सविस्तर स्पष्टीकरण करण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी प्रशिक्षणाला विशेष दिशा देत उपस्थित शिक्षक व कर्मचार्‍यांकडून प्रत्यक्ष ईव्हीएम मशीन हाताळून घेतले. यावेळी कर्मचार्‍यांना असलेल्या शंकांचे यावेळी निरसन करण्यात आले. प्रत्यक्ष हाताळणी करतांना मशीन कसे सुरू करावे, याचे प्रात्यक्षिक करून घेतले. सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यत हे प्रशिक्षण सुरू होते. प्रशिक्षणास निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, सहायक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी राजेंद्र फातले, नायब तहसिलदार संतोष विनंते यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. त्यांच्या सोबत पुरवठा निरीक्षक रोशना रेवतकर, नायब तहसीलदार (महसूल) हेमंत गुरव आदी उपस्थित होते.

जोडणीची दिली माहिती
प्रशिक्षण वर्गात प्रत्येक कर्मचार्‍याने कंट्रोल युनिटशी बॅलेट युनिट जोडणे, मॉक पोल करणे, प्रात्यक्षिक मतदानाची नोंद तपासणे या सर्व टप्प्यांचे प्रत्यक्ष सरावाद्वारे ज्ञान आत्मसात केले. एम.पी. दाणी यांनी यावेळी कर्मचार्‍यांना मतदानाच्या दिवशी कोणत्याही चूक-चुकीच्या हाताळणीमुळे मतदान प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात, त्यामुळे पूर्ण दक्षता आणि नियमांचे पालन अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. कर्मचार्‍यांनी आताच काय शंका असतील त्या विचारू घ्याव्यात, याचे आवाहन केले.

तांत्रीक समस्या आल्यास तत्काळ माहिती द्यावी
नायब तहसिलदार संतोष विनंते यांनी निवडणूक प्रक्रियेतील निष्पक्षता, पारदर्शकता आणि गोपनीयतेचे महत्त्व अधोरेखित केले. मतदारांना योग्य मार्गदर्शन देणे, दिव्यांग व वृद्ध मतदारांना मदत करणे, मतदान केंद्र परिसरातील शांतता राखणे आणि संभाव्य तांत्रिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी तत्पर राहणे या बाबत महत्त्वाच्या सूचना त्यांनी दिल्या. कर्मचार्‍यांनी घाबरून न जाता, काही अडचण असल्यास वरिष्ठांना त्याची माहिती द्यावी, जेणे करून त्य समस्येवर उपाय शोधला जाईल.

मतदान कर्मचार्‍यांनी समन्वय ठेवावा
प्रशिक्षण वर्गात मतदान साहित्याची काळजी, केबल कनेक्शनमध्ये करावयाची दक्षता, मशीन सीलिंग प्रक्रिया आणि मतदानपूर्व मॉक पोलची नोंद व्यवस्थित भरण्याचे मार्गदर्शन केले. मतदान केंद्रावरील सुरक्षा, मतदान कर्मचार्‍यांचे समन्वय आणि मतदानानंतरची कार्यवाही याची शिस्तबद्ध माहिती विनंते यांनी दिली. मतदान केद्रावर आदल्या दिवशी गेल्यावर मतदान टेबल व मशीन ठेवण्याचे नियोजन करून घ्यावे.

कर्मचार्‍यांचे केले शंका समाधान
प्रशिक्षणादरम्यान कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला आणि ईव्हीएम हाताळणीतील शंका तज्ज्ञांकडून दूर केल्या. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांमुळे आगामी पालिकेच्या निवडणुका अधिक सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने पार पडतील, असा विश्वास प्रशिक्षणाला उपस्थित अधिकारी व कर्मचार्‍यांनी व्यक्त केला. यावेळी प्रशिक्षण हे ताप्ती पब्लिक स्कूल व नहाटा महाविद्यालयात दोन सत्रात पार पडले.

तर दाखल होणार गुन्हे
पालिका निवडणुकीसाठी ज्यांची ड्युटी लागलेली आहे, यातील अनेक कर्मचार्‍यांनी त्यांची ड्युटी रद्दसाठी अधिकार्‍यांच्या भेटी घेतल्या. कुणी आजारी असल्याचे तर कोणी आमचे नातेवाईक पालिका निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उभे असल्याचे कारण दिले. काही कर्मचारी आम्ही येणार नसल्याचे म्हणाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील, असे सप्टीकरण अधिकार्‍यांनी संबंधितांना दिले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !