राज्यासाठी सोडा गिरीश महाजनांनी जळगावसाठी तरी काय केले ? : रोहित पवारांचा सवाल
मुंबई (26 नोव्हेंबर 2025) : आपल्या आजोबांच्या कडीखांद्यावर खेळून आमदार झाल्याची टीका मंत्री महाजनांनी भुसावळातील सभेत केल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी खोचक शब्दात महाजनांवर पलटवार केला. विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवण्याची हिंमत त्यांच्यात नसून राज्यासाठी सोडा महाजनांनी जळगावसाठी काय केले? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला आहे.
आधी केले ट्वीट
जामनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठा गोंधळ झाला होता. भाजपच्या पदाधिकार्यांनी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना जबरदस्तीने अर्ज मागे घेण्यास भाग पाडले होते. रोहित पवारांनी त्याचे काही व्हिडिओ व्हायरल केले तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यानंतर महाजनांनी त्यांच्यावर पोस्टल मतांवर जेमतेम विजय झालेल्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये अशी टीका केली.



जळगावसाठी तरी काही केले का?
भुसावळच्या सभेत मंत्री महाजनांनी रोहित पवारांवर टीका केल्यानंतर आमदार रोहित पवार म्हणाले की, आपल्याला आपल्या कर्तृत्वावर एवढा विश्वास होता तर गुंडगिरी करून समोरच्या उमेदवारांना पकडून आणून बळजबरीने अर्ज मागे का घ्यायला लावले? विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवण्याची हिंमत का दाखवली नाही? एवढं मोठं मंत्रिपद असूनही आपण उत्तर महाराष्ट्र तर सोडा जळगावसाठी काय केलं, एकतरी उद्योग आणला का? जळगाव आपलं घर असताना आपलं सगळं चित्त फक्त नाशिककडंच का? असा प्रश्न त्यांनी केला.
आपल्या कार्यकाळात भकास असलेला विकास गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण मोटारसायकलवरून जात असतानाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने बघितलाच आहे. आता मंत्रिपद आहे तर किमान आपल्या भागाला, आपल्या जिल्ह्याला तरी फायदा करून द्या, असे ही ते म्हणाले.
तर त्यासाठी नशीब लागते
बाबांच्या खांद्यावर कडेवर खेळायला नशीब लागतं आणि आम्ही नाशिबवान आहोत आम्हाला पवार साहेबांसारखे बाबा (आजोबा) लाभले. बाकी तुमच्या 10 खात्यांच्या मंत्र्याला 2019 मधे 40 हजारांनी लोळवलं होते. यावेळी पण तोच डाव होता पण तुम्ही मतांची चोरी केली मात्र तुमच्यासह मुख्यमंत्र्यांनी तुमच्या सभेत विकासावर बोलण्यापेक्षा माझ्यावर टीका करावी लागते यातच कर्जत-जामखेडचं राजकीय वजन महाराष्ट्रात वाढल्याचं दिसून येते.


