एटीव्हीएमला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद : भुसावळ विभागात तिकीट विक्रीत 26.82 टक्क्यांची वाढ

एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 12 लाखांहून अधिक तिकिटांची विक्री


भुसावळ (26 नोव्हेंबर 2025) : एप्रिल ते 15 नोव्हेंबर या कालावधीत भुसावळ विभागात ऑटोमॅटिक टिकट व्हेंडिंग मशीन (एटीव्हीएम)द्वारे तब्बल 12 लाख दोन हजार पाच तिकिटांची विक्री झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत झालेल्या नऊ लाख 49 हजार 287 तिकिटांच्या तुलनेत 26.82 टक्क्यांची उल्लेखनीय वाढ नोंदवण्यात आली आहे. डिजिटल तिकीटिंगला चालना मिळावी आणि प्रवाशांना तिकिटांसाठी रांगेत न थांबता जलद सेवा मिळावी म्हणून रेल्वेकडून राबवण्यात आलेल्या उपक्रमाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

15 स्थानकावर 49 एटीव्हीएम यंत्रे
प्रवाशांना जलद, सुलभ आणि संपर्कविरहीत तिकीट सुविधा देण्यासाठी भुसावळ विभागातील 15 प्रमुख स्थानकांवर एकूण 49 एटीव्हीएम यंत्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. देवळाली, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, अमरावती, बर्‍हाणपूर आणि खंडवा या स्थानकांवर ही सेवा उपलब्ध आहे.




या सुविधेचा सहज वापर करता यावा म्हणून रेल्वे प्रशासनाने 12 प्रशिक्षित सहाय्यक (फॅसिलिटेटर्स) नेमले आहेत. हे कर्मचारी प्रवाशांना एटीव्हीएमवर तिकीट कसे काढायचे, क्यूआर कोड किंवा यूपीआयद्वारे पेमेंट कसे करायचे याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करतात. तिकीट काउंटरवरील कर्मचारीसुद्धा प्रवाशांना एटीव्हीएमकडे वळवून तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत.

एटीव्हीएमच्या वापराविषयी माहितीपूर्ण सूचना फलक स्थानकांवर लावण्यात आले आहेत, तसेच वाणिज्य विभागातील निरीक्षक आणि कर्मचारी सातत्याने जनजागृती करत आहेत.अनेक स्थानकांवर हेल्प डेस्कची व्यवस्था करून तिकीट तपासनीस आणि बुकिंग स्टाफकडून प्रवाशांना प्रत्यक्ष मदत दिली जात आहे. या उपक्रमामुळे भुसावळ विभागातील तिकीट प्रक्रियेला गती मिळाली असून प्रवासी मोठ्या प्रमाणात सेल्फ-टिकिटिंग संस्कृतीकडे वळताना दिसत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या डिजिटल उपक्रमामुळे प्रवाशांचा वेळ वाचत असून तिकीट खरेदीची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ बनली आहे. असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !