डॉक्टरांना 50 लाखांची खंडणी मागणार्‍या पाच जणांविरोधात गुन्हा


सातारा (15 डिसेंबर 2025) : सीएमएस पोर्टलवर अत्याचाराची खोटी तक्रार केल्यानंतर प्रकरण मिटवण्यासाठी आधी एक कोटी व नंतर 50 लाखांची खंडणी डॉक्टरांकडून मागण्यात आली मात्र डॉक्टरांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पाच संशयीतांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. म्हसवड, ता. माण येथे हा प्रकार घडला. संग्राम शेटे, दिनेश गोरे, अमोल राऊत, नितीन केवटे, दीपक रूपनवर (सर्व रा. म्हसवड, ता. माण) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

असे आहे प्रकरण
डॉ.बाबासाहेब मारुती दोलताडे (वय 46, रा. दोलताडे हॉस्पिटल, शिंगणापूर रोड, म्हसवड, ता. माण) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात 10 डिसेंबर 2025 रोजी फिर्याद दिली. त्यानंतर झीरो नंबरने हा गुन्हा म्हसवड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.



डॉ.दोलताडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, माहे ाक्टोबर 2025 ते 10 डिसेंबर या कालावधीत म्हसवड येथील दोलताडे हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. लक्ष्मण राखोंडे हा हॉस्पिटलमध्ये अकाउंटट होता. त्याने अंदाजे सात लाखांचा अपहार केल्याचा तक्रार अर्ज म्हसवड पोलिस ठाण्यात मी दिला होता. ती तक्रार माघारी घेण्यासाठी सर्व संशयितांनी संगनमत करून एका महिलेस सीएमएस पोर्टलवर अत्याचाराची खोटी तक्रार करण्यास लावून हे प्रकरण मिटविण्यासाठी एक कोटींची मागणी केली.

सरतेशेवटी तडजोडीअंती 50 लाख रुपयांची मागणी करण्यात आली व दोन दिवसांत पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकीही दिली. माझ्यावर पाळत ठेवली जात होती त्यामुळे मी सातार्‍याकडे निघून आलो. संबंधितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे मला म्हसवड पोलिस ठाण्यात जाऊ देणार नाहीत, अशी माझी खात्री झाल्याने मी सातारा शहर पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दिली, असेही डॉ. दोलताडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, हे प्रकरण संवेदनशील असल्यामुळे या प्रकरणाचा तपास एलसीबीकडे सोपविण्यात आला आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !