वरणगावात दोन्ही मंत्र्यांची पॉवर फेल : जनतेचा कौल विकासाला ; अपक्ष उमेदवार सुनील काळेंनी मंत्री महाजनांची प्रतिमा घेवून केला जल्लोष
गणेश वाघ
वरणगाव (21 डिसेंबर 2025) : वरणगावात भाजपाचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांना डावलून भाजपाने दुध संघ संचालिका श्यामल अतुल झांबरे यांना उमेदवारी दिली मात्र सुनील काळे यांनी बंडखोरी करीत त्यांच्या उमेदवाराला आव्हान दिले व जात-पात व धनशक्ती पाहून आपली उमेदवारी कापल्याचा दावा करीत षड्डू ठोकले. दुसरीकडे भाजपा उमेदवाराच्या विजयासाठी मंत्री संजय सावकारे व मंत्री रक्षा खडसेंनी प्रचार सभा घेत रान पेटवले मात्र वरणगावकरांनी केंद्रासह राज्यात सत्ता असलेल्या सत्ताधार्यांना दूर सारत विकासाच्या व पाणीप्रश्न सोडवण्याच्या मुद्द्यावर मत मागणार्या सुनील काळेंना कौल दिला. भाजपाचे बंडखोर असलेले अपक्ष उमेदवार सुनील काळे यांनी निकालानंतरही आपले भाजपावरील प्रेम कायम दाखवत मंत्री गिरीश महाजनांची प्रतिमा झळकावत आपण अद्याप भाजपेयीच असल्याचे दाखवून दिले.
भाजपाच्या दोन्ही मंत्र्यांना सर्वसाधारण कार्यकर्त्याचा धक्का
भुसावळात नगराध्यक्षपदाचे आरक्षण निघाल्यानंतर भाजपाने वरणगावात सामाजिक समीकरणे जुळतील या माध्यमातून श्यामल झांबरे यांना उमेदवारी जाहीर केली मात्र भाजपेयी असलेल्या सुनील काळेंंनी माघार घेतली नाही. सुरूवातीपासूनच त्यांनी भाजपाच्या नेत्यांवर विशेषतः मंत्री गिरीश महाजन, मंत्री रक्षा खडसे व मंत्री संजय सावकारे यांनी जात-पात व पैसा पाहून उमेदवारी कापल्याचा आरोप केला व वरणगावात पाणी योजना आणण्यासाठी कशा पद्धत्तीने आंदोलने केली हे माता-भगिनींना पटवून दिले. पैसे नसल्याने उमेदवारी कापल्याचे निमित्त त्यांनी पुढे करीत ‘एक नोट एक व्होट’ म्हणत घागरीच्या माध्यमातून निधीही जमवला व भाजपा नेत्यांवर प्रत्येक सभेतून टीकेचा आसूड ओढला. सर्वसाधारण कार्यकर्ता असलेल्या काळेंनी दोन्ही मंत्र्यांना येथे धक्का देत सहा हजार 468 मते मिळवली तर भाजपाच्या प्रतिस्पर्धी श्यामल अतुल झांबरे यांना पाच हजार 686 मते मिळाल्याने 782 मते मिळवून येथे काळे विजयी ठरले.

अपक्षांचा सुपडा साफ मात्र भाजपाला 14 जागा
वरणगाव पालिकेमध्ये भाजपच्या 14, शिंदे शिवसेनेच्या पाच तर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाला दोन जाागंवर यश मिळाले. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवाराची येथे वर्णी लागली असून आगामी काळात भाजपा-शिंदे गटाची खेळी कशी अवलंबून राहते त्यावर शहराचा विकास व राजकारण अवलंबून असणार आहे.
असे आहेत प्रभागनिहाय विजयी उमेदवार
प्रभाग एक अ : शुभम सुधाकर जावळे 888 (भाजप)
प्रभाग एक ब : मनीषा नितीन माळी 977 (भाजप)
प्रभाग 2 अ : सय्यद इरफान अली आशिक अली 721 (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट)
प्रभाग 2 ब : वैशाली पंकज धनगर 530 (भाजप)
प्रभाग 3 अ : रवींद्र शांताराम सोनवणे 602 (भाजप)
प्रभाग 3 ब : दीपाली श्रीकृष्ण माळी 751 (भाजप)
प्रभाग 4 अ : निलेश वसंत चौधरी 924 (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट)
प्रभाग 4 ब : वृषाली आशिषकुमार चौधरी 818 (भाजप)
प्रभाग 5 अ : शबिनाबी इफ्तेखार बेग 433 (भाजप)
प्रभाग 5 ब : अशपाक शाह सगीर शाह 818 (शिवसेना शिंदे गट)
प्रभाग 6 अ : दीपेश शालिग्राम पाटील 915 (भाजप)
प्रभाग 6 ब : भाग्यश्री महेश सोनवणे 919 (भाजप)
प्रभाग 7 अ : माधुरी संदीप हळदे 664 (भाजप)
प्रभाग 7 ब : श्रद्धा दिलीप गायकवाड 547 (भाजप)
प्रभाग 8 अ : अरुणा शामराव इंगळे 940 (भाजप)
प्रभाग 8 ब : शबाना जुम्मा खाटीक 748 (शिवसेना शिंदे गट)
प्रभाग 9 अ : वंदना भगवत पाटील 671 (भाजप)
प्रभाग 9 ब : निलेश वामन खाचणे 778 (भाजप)
प्रभाग 10 अ : तृप्ती समाधान महाजन 1080 (शिवसेना शिंदे गट)
प्रभाग 10 ब : माला मिलिंद मेढे 1473 (शिवसेना शिंदे गट)
प्रभाग 10 क : विनोद गणेश झोपे1625 (शिवसेना शिंदे गट)
