फैजपूर पालिकेत भाजपाच्या दामिनी पवन सराफ यांचा दणदणीत विजय !


BJP’s Damini Pawan Saraf wins a resounding victory in the Faizpur municipality ! फैजपूर (22 डिसेंबर 2025) : फैजपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदी दामिनी पवन सराफ विजयी (10 हजार 89) झाल्या आहेत. अखेरच्या क्षणी त्यांनी विजयश्री खेचून आणत प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारसुमया बी (9077) यांचा एक हजार 17 मतांनी पराभव केला. निकालानंतर भाजपा समर्थकांनी जल्लोष केला.

अखेरच्या क्षणी झाला विजय
10 फेर्‍यांमधून नऊ फेर्‍यांमध्ये सुमया बी.कुर्बान या पुढे होत्या व दहाव्या फेरीतील मतांनी सराफ यांचा विजय सुकर केला. पालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून नऊ जागांवर विजय मिळवत भाजपा सत्तेत असून काँग्रेसने सुद्धा पाच जागांवर विजय मिळवला. अजित पवार राष्ट्रवादी गटाच्या दोन व शरद पवार गटाचा एक उमेदवार विजयी झाला. या निवडणुकीत प्रथमच एमआयएमच्या माध्यमातून एका उमेदवाराचा प्रवेश झाला आहे मात्र शिवसेना उभाठा व शिंदे गटाला साधा भोपळाही फोडता आलेला नाही.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
रविवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर एक एक-एक प्रभागाचा निकाल हाती येऊ लागला व उमेदवारांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आपला आनंदोत्सव साजरा केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा भुसावळ तहसीलदार नीता लबडे यांनी निकाल घोषित केले. त्यांना सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश गांगुर्डे यांनी सहकार्य केले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून एपीआय रामेश्वर मोताळे व त्यांच्या सहकार्‍यांनी बंदोबस्त राखला.

भाजपाचे 19 पैकी नऊ उमेदवार विजयी : आमदारांचे सुक्ष्म नियोजन
भाजपाने या निवडणुकीत नवख्या तसेच तरुण उमेदवारांना संधी देत निवडणूक रिंगणात उतरवले होते मात्र 19 पैकी केवळ नऊ जागांवरच त्यांना विजयी श्री मिळवता आली. त्यातही आधीच तीन उमेदवार बिनविरोध झाले. या निवडणुकीची सर्व सूत्र आमदार अमोल जावळे यांच्याकडे होती त्यांनी या निवडणुकीत सूक्ष्म नियोजन केले होते व नगराध्यक्ष पदासाठी तरुण व नवख्या उमेदवार दामिनी सराफ यांना मैदानात उतरविले होते त्यांनी मात्र शेवटच्या क्षणी विजयश्री खेचून आणली.

भाजपा समर्थकांचा जल्लोष
निकाल जाहीर होताच शहरात भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. नवनिर्वाचित नगराध्यक्ष दामिनी पवन सराफ यांच्यासह सर्व विजयी नगरसेवकांचे समर्थकांनी अभिनंदन केले. भाजपच्या या यशामुळे फैजपूर शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !