चुंचाळे फाट्याजवळ भुसावळच्या दुचाकीस्वाराकडील साडे चोवीस लाख लुटले
यावल (29 डिसेंबर 2025) : चोपडा रोडावर असलेल्या चुंचाळे फाटा येथे चोपड्याकडून भुसावळ जात असलेल्या एकाची दुचाकी अडवून अज्ञात चोरट्यांनी त्याच्याजवळील बॅगेत असलेली साडे चोवीस लाखाची रोकड लांबवली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
काय घडले यावल तालुक्यात ?
भुसावळ येथील किरण प्रभाकर पाटील (50, रा. राम मंदिर वार्ड, भुसावळ) हे दुचाकीद्वारे चोपडा येथून साडे चोवीस लाख एका बॅगमध्ये घेऊन भुसावळ जात होते. दरम्यान चुंचाळे फाट्याजवळ किरण पाटील यांच्या दुचाकीजवळ एका दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञातांनी ल रोकड असलेली बॅग हिसकावून त्यांनी पळ काढला. हा प्रकार घडल्यानंतर पाटील यांनी तातडीने यावल पोलीस ठाणे गाठले व पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे हे पथकासह दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा केला. व ज्या दिशेने वाहन घेऊन चोरटे पळाले आहेत त्या दिशेने पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. घटनेची माहिती मिळतात फैजपूरचे डिवायएसपी अनिल बडगुजर हे देखील घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

