यावल-भुसावळ रस्त्यावर कंटेनरच्या धडकेत वृद्ध ठार
यावल (29 डिसेंबर 2025) : शहरात भुसावळकडून येणाऱ्या रस्त्यावर एका कंटेनरच्या धडकेत वृद्ध इसमाचा मृत्यू झाला. भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनर चालकाने रस्ता ओलांडणाऱ्या ६९ वर्षीय वृद्धाला जबर धडक दिली होती. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कंटेनर ट्रक चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल शहरात भुसावळकडून येणाऱ्या रस्त्यावरून कंटेनर ट्रक (क्रमांक एम. एच. ४० सी.एम. १४४२) घेऊन प्रेमसिंग मोतीलाल सिसोदिया (30) हा तरुण येत होता. भरधाव वेगात येत असतांना रस्ता ओलांडत असलेल्या दत्तात्रय पांडुरंग जाधव (६९, रा.साने गुरुजी शाळेजवळ, यावल) यांना त्याने जबर धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला, हाताला, पायाला गंभीर दुखापती झाल्या आणि ते जागीच ठार झाले. तातडीने त्यांना तेथून उचलून ग्रामीण रुग्णालय, यावल येथे नेण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. या अपघात प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात योगेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून कंटेनर ट्रक चालक प्रेमसिंग सिसोदिया यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन करीत आहे.

