निंभोरा बुर्दुकमध्ये तरुणावर चाकू हल्ला : तीन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
Young man attacked with a knife in Nimbhora Burduk : Case registered against three unknown individuals भुसावळ (30 डिसेंबर 2025) : मोटारसायकल सुसाट चालवू नका, असे सांगितल्याचा राग मनात धरून तीन अज्ञात तरुणांनी एका नागरिकावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना निंभोरा बुर्दुक येथे घडली. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.
काय घडले निंभोर्यात ?
गौतम हरी साळवे (34, रा.राम मंदिराच्या मागे, निंभोरा बुर्दुक) हे 25 डिसेंबर रोजी सायंकाळी श्रज्ञी वाजता आपल्या घरासमोरील अंगणात मुलासह उभे होते. यावेळी रस्त्यावरून काही तरुण मोटारसायकल जोरात चालवत ये-जा करत होते. यामुळे अपघाताची शक्यता लक्षात घेऊन गौतम साळवे यांनी वाहन हळू चालवण्यास सांगितले. मात्र, याचा राग आल्याने काही वेळातच तेच तरुण परत आले.

आरोपींपैकी एकाने (लांब केस, काळा-पांढरा टी-शर्ट व काळी जिन्स पॅन्ट घातलेला) हातातील चाकूने गौतम साळवे यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूस व वरच्या भागात वार केला. हा हल्ला जीवघेणा असून, ठार मारण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. हल्ल्यावेळी आरोपींनी शिवीगाळ व धक्काबुक्की करत दहशत निर्माण केली. या घटनेत फिर्यादी जखमी झाले. त्यांना तत्काळ भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी जिल्हा नियंत्रण कक्षात माहिती मिळाल्यानंतर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश गायकवाड व सहकारी करीत आहेत.
