भुसावळातील झोनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधील 80 वर प्रशिक्षणार्थींना विषबाधा

खाजगीसह रेल्वे रुग्णालयात उपचार : जेवणाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह


Over 80 trainees at the Zonal Training Institute in Bhusawal suffered from food poisoning भुसावळ (30 डिसेंबर 2025) : शहरातील झोनल रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधील विविध विभागात प्रशिक्षण घेणार्‍या सुमारे 80 वर प्रशिक्षणार्थींना रात्रीच्या जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक व तितकाच संतापजनक प्रकार घडल्याने रेल्वे वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उपचारार्थ प्रशिक्षणार्थींवर रेल्वेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झेडआरटीआयचे प्राचार्य रामनिवास मीना यांच्या माहितीनुसार, 40 रुग्णांवर रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू असून या सर्व प्रकाराची आता चौकशी केली जाणार आहे.

काय घडले भुसावळात ?
भुसावळ शहरातील रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये लोकोपायलट, असिस्टंट लोको पायलट, स्टेशन मास्टर, गार्ड आणि तिकीट तपासणी कर्मचारी अशा विविध पदांचे प्रशिक्षण सुरू आहे. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक अनेक प्रशिक्षणार्थींना उलट्या आणि मळमळ, हगवणुकीचा त्रास सुरू झाला. अवघ्या काही वेळातच बाधितांचा आकडा 80 पर्यंत पोहोचल्याने प्रशिक्षण केंद्रात भीतीचे वातावरण पसरले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तातडीने रुग्णवाहिका पाचारण केल्या आणि सर्व बाधितांना रेल्वे रुग्णालयात हलवले.

जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह
ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या मेसमध्ये देण्यात आलेल्या अन्नामुळेच ही विषबाधा झाली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मध्यरात्रीच्या वेळी एवढ्या मोठ्या संख्येने कर्मचारी आजारी पडल्याने रेल्वेच्या आरोग्य विभागाची मोठी तारांबळ उडाली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता कामगार संघटनांकडून केली जात आहे.

एनआरएमयू संघटना आक्रमक
रेल्वे कर्मचार्‍यांना विषबाधा झाल्यानंतर एनआरएमयू संघटना शहरात आक्रमक झाली आहे. या प्रकाराविरोधात एनआरएमयू संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी रेल्वे रुग्णालयातील कॅन्टीनजवळ निदर्शनेही केली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !