वरणगावात नगराध्यक्षांच्या मिरवणुकीवर दगडफेक : सहा जण किरकोळ जखमी


Stone pelting on the mayor’s procession in Varangaon : Six people sustained minor injuries भुसावळ (31 डिसेंबर 2025) : वरणगाव नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी वरणगावकरांच्या उपस्थितीत नगरपालिकेत पदभार स्वीकारल्यानंतर नव्या नगरपालिकेकडून शहरातून मंगळवारी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक गांधी चौकात पोहोचताच अज्ञात व्यक्तींनी सुनील काळे बसलेल्या ट्रॅक्टरवर दगडफेक केली. या दगडफेकीत सुनील काळे हे काही क्षण आधीच ट्रॅक्टरवरून उतरल्यामुळे सुदैवाने बचावले मात्र या घटनेत सहा कार्यकर्त्यांना दुखापत झाली. त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.

सहा कार्यकर्ते जखमी
जखमींमध्ये सुरेश माळी, अतुल वंजारी, फझल शेख, गणेश तेली, कुंदन माळी आणि पप्पू ठाकरे यांचा समावेश आहे. लोकशाही प्रक्रियेवर घाला घालणारी ही घटना असून ती अत्यंत निंदनीय असल्याचे मत नगराध्यक्ष सुनील काळे यांनी व्यक्त केले.

दोषींवर व्हावी कठोर कारवाई
या घटनेबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. शहरातील राजकारण हे तत्त्वांवरून गुद्यांवर येत असल्याचे चित्र दिसत असले तरी अशा प्रकारच्या हिंसक कृत्यांमुळे समाजात अस्थिरता निर्माण होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. तरुणांचे डोके भडकवणार्‍या व अशा कृत्यांमागील अज्ञात व्यक्तींना तात्काळ शोधून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !