भुसावळ रेल्वे प्रशिक्षण संस्थेत कर्मचार्यांना विषबाधा : मंत्री संजय सावकारेंंनी घेतली रुग्णांची भेट
Employees suffered food poisoning at the Bhusawal Railway Training Institute: Minister Sanjay Savkare visited the patients भुसावळ (31 डिसेंबर 2025) : शहरातील झोनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास 140 वर प्रशिक्षणार्थी कर्मचार्यांना भेंडीच्या भाजीतून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला होता. बाधीतांना रेल्वेच्या रुग्णालयात तसेच खाजगी रुग्णालयात हलवल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले तर मुंबईसह नागपूरातूनही डॉक्टरांची टीम पाचारण करण्यात आले. भुसावळातील या घटनेची दखल घेत मंत्री संजय सावकारे यांनी बुधवार, 31 डिसेंबर रोजी रेल्वे रुग्णालयात जावून बाधीतांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.
काय घडले भुसावळात ?
भुसावळ शहरातील रेल्वे ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये लोकोपायलट, असिस्टंट लोको पायलट, स्टेशन मास्टर, गार्ड आणि तिकीट तपासणी कर्मचारी अशा विविध पदांवरील कर्मचार्यांना प्रशिक्षण दिले जाते व ‘अन्नपूर्णा’ मेसमध्ये संबंधित कर्मचारी जेवण करतात. 250 रुपये जेवणासाठी संंबंधित कंत्राटदार आकारतो मात्र जेवणाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप कर्मचारी खाजगीमध्ये बोलताना करतात. मंगळवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक अनेक प्रशिक्षणार्थींना उलट्या आणि मळमळ, हगवणुकीचा त्रास सुरू झाला. अवघ्या काही वेळातच बाधितांचा आकडा शंभरावर पोहोचल्याने प्रशिक्षण केंद्रात भीतीचे वातावरण पसरले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रेल्वे प्रशासनाने तातडीने रुग्णवाहिका पाचारण केल्या आणि सर्व बाधितांना रेल्वे रुग्णालयात हलवले.

मंत्र्यांनी साधला यंत्रणेशी संवाद
भुसावळ रेल्वे प्रशिक्षण संस्थेतील कॅन्टीनमध्ये दिल्या गेलेल्या जेवणात भेंडीच्या भाजीमध्ये अळ्या आढळून आल्याने अनेक कर्मचार्यांना विषबाधा झाल्याची बाब अत्यंत गंभीर व दुर्दैवी असल्याचे मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सहकार्यांसह रेल्वे रुग्णालयात जावून बाधीत कर्मचार्यांची विचारपूस केली तसेच उपचारांची माहिती जाणली. यावेळी वैद्यकीय सुविधांबाबत डॉक्टरांशी संवाद साधण्यात आला.
कॅन्टीन चालकाचा निष्काळजीपणा
कर्मचार्यांना विषबाधा होण्यामागे कॅन्टीन चालक तसेच अन्नपुरवठा करणार्या संबंधित ठेकेदाराचा गंभीर निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून आला आहे. याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या असून रेल्वे कर्मचार्यांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असे मंत्री संजय सावकारे यांनी स्पष्ट केले.
काटेकोरपणे व्हावी नियमांची अंमलबजावणी
भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी कॅन्टीनमधील अन्नाच्या दर्जावर काटेकोर नियंत्रण, नियमित तपासणी व स्वच्छतेबाबत कठोर नियमांची अंमलबजावणी करणे अत्यावश्यक असून या संदर्भात खबरदारी घेण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना दिल्याचे मंत्री संजय सावकारे यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’शी बोलताना सांगितले. यावेळी भाजपा गटनेते युवराज लोणारी, उपगटनेता परीक्षीत बर्हाटे आदींसह सीएमएस शिवकुमार व्यंकटेश आदींची उपस्थिती होती.
