भुसावळातील ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत सराफ यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर
Senior journalist Shrikant Saraf from Bhusawal has been announced as the recipient of the ‘Lifetime Achievement’ award भुसावळ (6 जानेवारी 2026) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ (मुंबई) तर्फे 2026 या वर्षासाठी जीवनगौरव व दर्पणकार पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी पुरस्कारांची घोषणा केली. भुसावळातील ‘दिव्य मराठी’ दैनिकाचे वरिष्ठ रिपोर्टर श्रीकांत सराफ यांना या वर्षीचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पत्रकारितेतील निष्ठावंत व समाजाभिमुख कार्याचा गौरव करण्यासाठी मंगळवार, 6 रोजी पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी हे पुरस्कार प्रदान केले जातात. यंदा या पुरस्कारांचे वितरण महिनाअखेरीस जळगाव येथे होणार आहे.
31 वर्षांपासून पत्रकारितेत
भुसावळातील दिव्य मराठीचे वरिष्ठ रिपोर्टर श्रीकांत सराफ हे पत्रकारिता क्षेत्रात सुमारे 31 वर्षांपासून कार्यरत आहेत. लोकमत, सकाळ व दिव्यमराठी असा त्यांचा वृत्तपत्रांचा प्रवास राहिला आहे. या माध्यमातून विविध विषयांना त्यांनी वाचा फोडत जनसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे शिवाय ‘क्राईम’मध्ये त्यांचा मोठा हातखंडा आहे. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर विविध क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकारिता क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


पुरस्कारार्थी पत्रकार असे-
जीवनगौरव पुरस्कार : वरिष्ठ पत्रकार श्रीकांत सराफ (दिव्य मराठी, भुसावळ)
दर्पणकार पुरस्कार
पुरस्कारार्थीमध्ये ‘सकाळ’चे ’ब्यूरो चीफ’ सचिन जोशी, पत्रकार शशिकांत पाटील, गणेश सुरसे, दीपक महाले, प्रसाद धर्माधिकारी (नशिराबाद), डॉ.गोपीचंद सोरडे, दीपक पवार (लोहारा)
ऑनलाईन मीडिया- इम्तियाज अहमद, जुगल पाटील, शुभदा नेवे, रवी गोरे, सोनम पाटील, दिलीप पाटील, जितेंद्र कोतवाल
लोकहित जपणार्यांचा होणार सन्मान
सत्य, निर्भीडता आणि लोकहित जपणार्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार असून या महिन्याच्या अखेरीस जळगावात येथे होणार्या कार्यक्रमात पत्रकारांचा सन्मान केला जाणार आहे. आगामी काळातही पत्रकारांच्या सन्मानासाठी असे उपक्रम सातत्याने राबविले जातील, असे संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे यांनी सांगितले.







